आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर पोलिसांना चोरटे पडले भारी, चोवीस तासांत चार चोऱ्या उघडकीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी शहरात घातलेला धुमाकूळ अद्यापही कायम असून मागील चोवीस तासात शहरात चार चोरीच्या घटना घडल्याने चोरटे पोलिसांना भारी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र शहरात कायम असल्याने शहरातील पोिलस यंत्रणेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 
 
उत्तमनगरात भरदिवसा मंगळसुत्र लंपास: घरासमोरअंगणात असलेल्या महिलेच्या गळ्यातून भरदिवसा मंगळसुत्र लंपास केल्याची घटना बुधवारी (दि. १३) दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास घडली. सदर महिला सकाळी पावणेबारा वाजताच्या सुमारास अंगणात काम करीत असताना दोन युवक एमएच-२७-बीएम-९६७२ क्रमांकाच्या दुचाकीवर आले. दुचाकीवर मागे बसलेल्या युवकाने गळ्यातील मंगळसुत्राला झटका मारून लंपास केले. मंगळसुत्राची अंदाजे किंमत दहा हजार रुपये असून भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. महिलेच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
भर दुपारी चोरी: अमरावती।नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील यास्मीन नगर येथील किरणा दुकानातून भरदुपारी २० हजार रुपये लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. १२) उघडकीस आली. यास्मीन नगर येथील अब्दुल रहेमान अब्दुल सलाम यांचे किराणा दुकान आहे. दुपारच्या सुमारास दुकानाचे दार ओढून ते घरात झोपले असताना अज्ञात चोरट्याने दुकानातून २० हजार रुपये रोख लंपास केले. अब्दुल रहेमान अब्दुल सलाम यांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोिलस ठाण्यात अज्ञात चोऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
दोन लाखांची घरफोडी: साईनगरपरिसरातील हरीओम कॉलनीतील अमोल रमेशसिंह चव्हाण यांच्या घरून अज्ञात चोरट्याने सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. १२) उघडकीस आली. मंगळवारी रात्रीच्या सुमारास चव्हाण कुटुंबिय घरात झोपले असताना चोरट्याने किचनच्या खिडकीचे ग्रील काढून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने घरातून गोफ, अंगठ्या, चांदीच्या समई, घड्याळ, रोख २१ हजार २१० असा एकूण लाख ९४ हजार ११० रुपयांचा एेवज लंपास केला. चौव्हाण यांच्या तक्रारीवरून मंगळवारी राजापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
इतवाऱ्यात दोन दुकान फोडले: शहरात चोऱ्यांचे सत्र सुरू असतानाच चोरट्यांनी आपला मोर्चा इतवारा बाजारातील दुकानांवरही वळवला आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास इतवारा बाजारातील दोन दुकाने फोडून चोरट्यांनी माल लंपास केला. इतवारा बाजारातील फ्रुट लाईन येथील नितीन रवीशंकर कनोजिया यांच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी रोख तीन हजार रुपये चौदाशे रुपयांचे चिवड्याचे पाकिट असा एकून ४४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना मंगळवारी (दि. १२) उघडकीस आली. कनोजिया यांचे इतवारा बाजारातील फ्रुट लाईन येथे अर्नव फुटाणे भंडार नावाचे दुकान आहे. कनोजिया रात्री दुकान बंद करून गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाचे कुलुप तोडून रोख तीन हजार रुपये चिवड्याचे पाकिट लंपास केले. कनोजिया यांच्या तक्रारीवरून मंगळवारी सिटी कोतवाली पोिलस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसऱ्या घटनेत इतवारा बाजारातील खरपे लाईन येथील अब्दुल कदीर अब्दुल कादर यांचेही दुकान फोडून चोरट्याने दुकानातील साहित्य लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि. १२) रात्रीच्या सुमारास घडली. अब्दुल कादीर सोमवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असताना त्यांना दुकानाचे कुलुप तुटलेले आढळले. अब्दुल कादीर अब्दुल कादर यांच्यातक्रारीवरून मंगळवारी सिटी कोतवाली पोिलस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...