आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • RTO: Human Resource Shortage Although Target Accomplish

'आरटीओ' सक्रिय: मनुष्यबळ अपुरे असतानाही'टार्गेट'पेक्षाही दुप्पट वसुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - काम करण्याची इच्छाशक्ती असली तरच चांगले काम होऊ शकते आणि त्यातून आनंदही मिळतो. असाच प्रकार उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) कार्यालयात दिसून येत आहे. आरटीओ कार्यालयाने महिन्याचे महसुलाच्या उद्दिष्टापेक्षा दुप्पट उद्दिष्ट पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे अपुरे मनुष्यबळ असतानाही हा विभाग सक्रियतेने काम करत आहे.

वाहनधारकांना परवाने देणे, वाहनांशी संबंधित इतर कामे करणे तसेच वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आरटीओ विभागाला आहेत. त्यानुसार आरटीओ विभाग काम करत असतो. मात्र, दिवसेंदिवस वाहनांच्या वाढणाऱ्या संख्येच्या तुलनेत मात्र या विभागात मनुष्यबळ वाढत नसल्याचे वास्तव आहे. अनेक वर्षांपासून या विभागात मोठा अनुशेष आहे. त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. कार्यरत असलेल्या मनुष्यबळात ठरवून दिलेल्या उद्दिष्टानुसार या विभागातील कर्मचारी काम करत आहेत. परवाने देणे आणि वाहनांची तपासणी करताना या विभागाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आरटीओ विभागात मंजूर असलेल्या विविध पदांपैकी ४० टक्के पदे रिक्त आहेत. परिवहन आयुक्तांनी अकोला येथील आरटीओ कार्यालयाला महिन्याचे सहा लाख ६७ हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. असे असताना दर महिन्याला १२ लाख रुपयांवर महसूल हा विभाग कारवाई आणि परवान्यांच्या माध्यमातून जमा करत आहे. प्रभारींच्या खांद्यावर जबाबदारी असलेला हा विभाग सद्य:स्थितीत संपूर्ण विदर्भात अपुऱ्या मनुष्यबळातही चांगले काम करत असल्याचे दिसून येत आहे.

२२ पदे आहेत रिक्त : आरटीओ विभागात एकूण ५९ पदे मंजूर आहेत. मात्र, २२ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये अधिकारी दर्जाची सर्वाधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कारवाई करताना अडचणी येत आहेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षकांची सात पदे आहेत. त्यापैकी पाच पदे रिक्त आहेत. सहायक मोटार वाहन निरीक्षकांची १५ पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी १० पदे रिक्त आहेत. अधिकारीवर्गाची १५ पदे रिक्त असल्यामुळे वाहनांवर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.

वाहतूक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या २३ मंजूर पदांपैकी अधिकारीच कार्यरत : परवानेदेण्यासोबतच वाहनांवर कारवाई करण्यासाठी या विभागात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह वाहतूक निरीक्षक उपनिरीक्षक दर्जाची महत्त्वाची मंजूर पदे २३ आहेत. मात्र, या विभागात प्रत्यक्षात आठच अधिकारी कार्यरत आहेत. दोघा-तिघांची दररोज सुटी गृहीत धरल्यास केवळ पाच अधिकाऱ्यांवरच आरटीओ विभागाचे कामकाज चालत असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात कारवायांवर आमचा भर
मनुष्यबळाच्या अभावी जिल्हाभर कारवाया करताना आमची दमछाक होते. पाच ते सहा निरीक्षकांच्या भरवशावर कारवाया सुरू आहेत. त्यामुळे शहरात कारवाया करताना आम्हाला त्रास होतोे. मात्र, शहरात वाहतूक पोलिस कारवाया करत असल्यामुळे जिल्ह्यात कारवायांवर आमचा भर आहे. राजेंद्र वाढोकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

अडीच महिन्यांच्या कालावधीत एक कोटी तीन लाखांचा महसूल
ऑटोच्या परवाना नूतनीकरणाच्या माध्यमातून अकोला आरटीओ कार्यालयाने मोठा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या अडीच महिन्यांदरम्यान या विभागाने एक कोटी तीन लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. यादरम्यान हजारो ऑटोंच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले अाहे.