आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात ग्रामीण रोजगार हमी योजनेचा बट्ट्याबोळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम मिळावे, त्यांचे इतर शहरात होणारे स्थलांतर कमी व्हावे, यासाठी शासनाने महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना सुरू केली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ग्रामपंचायती विविध यंत्रणाकडून ४३९ कामे सुरू करण्यात आली असून, त्यावर नाममात्र ३१ हजार ९०२ मजूर काम करत आहेत. त्यातच जाचक अटींमुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमधील ग्रामपंचायतींनी या योजनेच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अद्यापही जिल्ह्यातील लाखो मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्यावर घरी ठाण मांडून बसण्याची वेळ आली आहे. या कामाची मजुरांची स्थिती पाहता या योजनेचा जिल्ह्यात बट्ट्याबोळ झाला असल्याचे दिसून येत आहे.
गावातच हाताला काम मिळेल या आशेने जिल्ह्यातील जवळपास सहा लाख ३४ हजार ३६५ मजुरांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी आतापर्यंत दोन लाख ५५ हजार ८५४ मजुरांना जॉब कार्ड देण्यात आले आहे. जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी प्रशासनाने दोन लाख ६४ हजार ९६० मजूर क्षमता असलेली सात हजार ७२९ कामे प्रस्तावित केली आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील चार हजार ८५६ विविध यंत्रणेच्या दोन हजार ८७३ कामांचा समावेश आहे. त्यापैकी प्रत्यक्षात ४३९ कामे सुरू करण्यात आली असून, त्यावर ३१ हजार ९०२ मजुरांची उपस्थिती आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील १६५ यंत्रणेच्या २७४ कामांचा समावेश आहे. तसेच ३१ हजार ९०२ मजुरामध्ये ग्रामपंचायतीच्या कामावर १७ हजार ५५५ विविध यंत्रणेच्या कामावरील १४ हजार ३४७ मजुरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या योजनेची कामे करण्यासाठी जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ग्रामपंचायतींनी नकार दिल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये संग्रामपूर सात कामे, शेगाव सहा, मलकापूर सात, खामगाव एक, बुलडाणा पाच, देऊळगावराजा तालुक्यात केवळ दोन कामे सुरू करण्यात आली आहेत. लोणार तालुक्यात ग्रामपंचायतींच्या स्तरावर एकही काम सुरू करण्यात आले नाही. सध्या जिल्ह्यात सर्वत्र निर्माण झालेली दुष्काळसदृश्य परिस्थिती पाहता मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी या योजनेला गती देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

रोजगार हमी योजनेच्या कामांना गती देण्याची अपेक्षा
दीडते दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली होती. हाताला काम नसल्यामुळे मजूरावर उपासमारीची पाळी आली. अशा परिस्थितीत रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलयुक्त शिवार, पाणलोट, अपूर्ण राहिलेल्या सिंचन विहिरीची कामे, नाला बांध, तसेच ग्रामपंचायती स्तरावर खडीकरण, वैयक्तिक लाभाच्या विहिरी, शेतरस्ते आदी कामांना चालना देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रस्तावित कामे
जिल्ह्यातसात हजार ७२९ कामे प्रस्तावित करण्यात आली असून, त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील चार हजार ८५६ आणि विविध यंत्रणेतील दोन हजार ८७३ कामांचा समावेश आहे. या प्रस्तावित यंत्रणेच्या कामावर एका लाख १७ हजार १९३ मजूर, तर ग्रामपंचायत स्तरावर एक लाख ४७ हजार ७७६ मजूर अपेक्षित आहेत.