आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माऊंट कारमेलमध्ये पडलेला विद्यार्थी गंभीर, शाळेत तगडा बंदोबस्‍त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - माऊंटकारमेल इंग्लिश स्कूलमध्ये दुसऱ्या वर्गात शिकणारा विद्यार्थी बुधवारी मधल्या सुटीत पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यानंतर त्याला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. दिल्ली गुडगाव येथील घटनेप्रमाणे पडसाद उमटू नयेत म्हणून पोलिसांनी शाळेत तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. 
 
गंभीर जखमी झालेला विद्यार्थी दुसऱ्या वर्गात शिकतो. बुधवारी सुमारे ११ वाजता त्याच्या पालकांना शाळेतून फोन करण्यात आला आणि तत्काळ बोलावून घेण्यात आले. ते आल्यानंतर तुमचा मुलगा खेळताना पाय घसरून पडला, त्यामुळे तो जखमी झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. पालक आले तेव्हा मुलगा बेशुद्धावस्थेत होता. पालक शिक्षकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. सिटीस्कॅन केल्यानंतर मेंदूला गंभीर इजा झाल्याचे समोर आले. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी शहरातील एका खासगी मोठ्या हॉस्पीटलमध्ये त्याला हलवण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. गुरुवारी संध्याकाळपर्यंत मुलगा बेशुद्धावस्थेत होता. या प्रकरणी पोलिसांनी सतर्कता म्हणून गुरुवारी सकाळी शाळेत पोलिस बंदोबस्त तैनात केला. विशेष म्हणजे दिवसभर शाळेला पोलिस बंदोबस्त असताना शिक्षण विभागाला काहीही माहित नव्हते. किंवा प्राथमिक शिक्षण विभागाला माहिती देण्याची गरज शाळेला वाटली नाही. नेमके विद्यार्थांसोबत काय घडले हे मुलगा शुद्धीवर आल्यावरच सांगू शकेल किंवा पोलिस तपासात ते समोर येईल. तर एकंदरीत या प्रकरणात शाळा प्रशासनाच्या पोलिस प्रशासनाच्या भूमिकेत संदिग्धता दिसून आली. 
 
शिक्षिकेने शिक्षा दिली की, मुलगा पडला?: मुलगा खेळताना पडला असे शाळा प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, शिक्षिकेने दिलेल्या शिक्षेत त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली अशी चर्चा आहे. तर मुलगा वरच्या मजल्या-हून पडल्या-चीही चर्चा होती. या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हे तपासल्यानंतरच नेमका काय प्रकार आहे हे समोर येणार आहे. पोलिस प्रशासनाने याबाबत मुलगा पडल्याची माहिती दिली. जर मुलगा पडला असेल, तर तगडा बंदोबस्त कशासाठी लावला असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. 
 
कारमेल शाळेतकाय घटना घडली मला नक्की माहित नाही. शाळेने कुठलेही रिपोर्टिंग मला केले नाही. उद्या माहिती घेतो. 
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) 
 
चौकशी केली,तीन मुलांचे बयाण नोंदवले. मुलगा पाय घसरून पडल्याचे त्यांनी सांगितले. तरीही सीसीटीव्ही फुटेज-साठी हार्डडिस्क ताब्यात घेतली आहे. अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त ठेवला आहे. 
- शैलेश सपकाळ, ठाणेदार, रामदासपेठ पाे. स्टेशन
 
बास्केटबॉल कोर्टकडे जाताना घसरून पडला 
विद्यार्थी हा बास्केटबॉल कोर्टकडे जात होता. जाताना त्याचा पाय घसरला आणि तो पडला. त्यात त्याच्या डोक्याला मार बसला. मात्र डोक्याला कोणतेही निशान दिसून आले नाही. लगेच त्याच्या पालकांना बोलावून घेतले. त्याच्यासोबत असलेल्या विद्यार्थीही तो स्वत:च पडल्याचे सांगत आहेत. 
- प्राचार्य फादर मॅथ्यू 
 
बातम्या आणखी आहेत...