आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेगळ्या शिक्षण कायद्याच्या मागणीसाठी काही शाळा बंद,१६ जुलैपासून बेमुदत बंदचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- प्रचलित कायद्याने प्रश्न सुटणार नाहीत म्हणून महाराष्ट्रासाठी वेगळा शिक्षण कायदा लागू करा, या मागणीसाठी आज जिल्ह्यासह शहरातील बहुतेक माध्यमिक शाळा बंद ठेवल्या गेल्या. शिक्षण संस्थांचे संचालक, मुख्याध्यापक शिक्षकांच्या संघटनांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या ‘शिक्षण बचाव समिती’ने या बंदची हाक दिली होती.

जिल्हयात ४२५ पैकी सुमारे ४०० शाळांनी बंद पाळल्याचे समितीचे म्हणणे आहे. दरम्यान, शिक्षण विभागानेही या म्हणण्याला दुजोरा दिला असून, बंदचा प्रभाव जिल्हाभर जाणवला, असे म्हटले आहे. २००५ नंतर नोकरीत समाविष्ट झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, प्रचलित नियमाप्रमाणे सर्व शाळांना अनुदान देऊन शिक्षक-कर्मचाऱ्यांना वेतन द्या, विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांनाही पोषण आहार पुस्तक योजनेचा लाभ द्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसारखीच खासगी शाळांनाही मालमत्ता करात सूट द्या, प्रत्येक शाळेत कला क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करा, सन २०१२ पासून थांबलेली शिक्षक भरती पुन्हा सुरू करा, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा नवीन आकृतिबंध लागू करा, आदी डझनभर मागण्या या बंदद्वारे पुढे आल्या आहेत. हिवाळी अधिवेशनात मागण्या लवकरच लागू करू, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले होते. मात्र, शिक्षण बचाव समितीने पाठपुरावा केल्यानंतरही त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचा निषेध म्हणूनच माध्यमिक शाळा बंद ठेवल्या. यामध्ये भारत विद्यालय, जागृती विद्यालय, शिवाजी विद्यालय, मोरदेवी खंडेलवाल विद्यालय आदी शाळांनी सहभाग नोंदवला, असे शिक्षण बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आंदोलनात जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळाचे अध्यक्ष विजय कौशल, सचिव अॅड. विलास वखरे आणि म. रा. शिक्षण संस्था महामंडळाचे विभागीय कार्यवाह भाऊसाहेब जानोळकर यांच्यासह कला क्रीडा शिक्षक संघटना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, विदर्भ मुख्याध्यापक संघ, विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनचे (विज्युक्टा) पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिक्षणबचावसमितीने पुकारलेला बंद नेमका किती शाळांमध्ये पाळला गेला, याची संख्या मिळवणे सुरू आहे. तालुकास्तरावरील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत ती मागवण्यात आली आहे. बंद शाळांची नेमकी संख्या अद्याप कळायची आहे. मात्र, हा बंद बहुतेक शाळांमध्ये होता, हे खरे आहे. प्रकाशमुकुंद, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), अकोला.
... तर १६ जुलैपासून बेमुदत बंद
विद्यार्थी-पालकांचेशैक्षणिकनुकसान होऊ नये, याची काळजी आम्हालाही आहे. शिवाय आम्हीही पालक आहोतच. मात्र, शासनातील प्रतिनिधी आश्वासनानुसार वागत नाहीत म्हणून बंदचा अप्रिय निर्णय घ्यावा लागला. हा निर्णय फार पूर्वीच शासनाला कळवला होता. त्यामुळे आताही निर्णय घेतला गेला नाही, तर १६ जुलैपासून बेमुदत बंद पाळला जाईल. विजयकौशल, अध्यक्ष जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळ.
आठवडाभरातच पहिला बंदशाळा सुरू होऊन आठवडाही उलटत नाही, तोच बंद पुकारला गेल्याने विद्यार्थ्यांना पहिल्या सात दिवसांतच शाळेचे बंद फाटक पाहावे लागले. वेळापत्रक मिळवणे, गणवेश आणि पुस्तके प्राप्त करून घेणे, एनसीसी-स्काऊट गाइडचे प्रतिनिधित्व मिळवणे, अशी काही कामे विद्यार्थ्यांना पूर्ण करावयाची होती. मात्र, शाळा बंद असल्याने या सर्व बाबींपासून ते वंचित राहिले. त्यामुळे अनेकांना या बंदचे वाईट वाटले. दुसरीकडे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुटी मिळाली म्हणून काहींनी या बंदचे स्वागतही केले.
बातम्या आणखी आहेत...