आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषदेसाठी अकोल्याची जागा शिवसेनेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विधानपरिषदेची अकोला, वाशीम, बुलडाणा ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या सूत्रांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे, तर दुसरीकडे भाजप कार्यालयाकडून या आशयाचे पत्रक प्रसिद्ध केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या एका गटाला शिवसेनेशी युती नको आहे, तर एका गटाला हवी आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत एकदा होऊनच जाऊ द्या, असे म्हणत जुळलेली युती तोडण्यात आली. त्यानंतर भाजपला या निवडणुकीत चांगल्यापैकी यश मिळाल्याने आता यापुढे कोणत्याही निवडणुकीत युती नको, अशी भूमिका पुन्हा एका गटाने घेतली. त्यामुळेच विधान परिषदेच्या जागा वाटपाचाही गुंता कधी नव्हे इतका वाढला. अकोला, अहमदनगर आणि मुंबईच्या जागा भाजपला हव्या होत्या. भाजपच्या एका गटाच्या म्हणण्यानुसार या तिन्ही जागी मैत्रीपूर्ण लढत झाली, तरी या तिन्ही जागा भाजपला मिळतात. त्यामुळेच या तिन्ही जागांसाठी भाजपच्या वरिष्ठांनी इच्छुकांना कामाला लावले होते. अकोला या जागेचाच विचार केला, तर सहा महिन्यांपूर्वी इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांची परवानगी घेऊन प्रचार सुरू केला होता. त्यामुळेच आता सहा महिन्यांच्या परिश्रमानंतर ही जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याच्या चर्चेने भाजपचे इच्छुक आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून अकोल्याची जागा शिवसेनेला सुटल्याची चर्चा आणि वार्ता सुरू आहे. परंतु, जागा सोडली असेल, तर मग अधिकृत घोषणा का नाही? असा प्रश्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात होता. आज ही जागा शिवसेनेला मिळाल्याच्या वृत्तास भाजप सूत्रांनी दुजोरा दिला. परंतु, पक्ष कार्यालयाने मग तसे पत्रक प्रसिद्धीस का दिले नाही? असा नाव छापण्याच्या अटीवर प्रतिप्रश्नही उपस्थित करून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या सर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला अाहे. यामुळे ही जागा शिवसेनेला सुटली असली, तरी भाजपच्या एका गटात निर्माण झालेली ही नाराजी दूर करण्याचे आव्हान शिवसेनेला पेलावे लागणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे रवींद्र सपकाळ बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी दिली.

आजचा दिवस निरंकच
उमेदवारी अर्ज विक्रीच्या सहाव्या दिवशी एकाही इच्छुकाने उमेदवारी अर्ज घेतला नाही, तर कोणत्याही पक्षाच्या इच्छुकाने अथवा अपक्षाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत. काही पक्षांमध्ये जागा वाटप, तर काही पक्षांमध्ये उमेदवारीत एकमत होत नसल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम म्हणजेच बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.