आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्याकांडामधील आरोपींना दुहेरी जन्मठेप, राजकीय वैमनस्यातून घडले होते हत्याकांड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - मलकापूर येथील सरपंच तथा शिवसेना जिल्हा उपप्रमुख सिद्धेश्वर देशमुख हत्याकांडातील चार आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले. त्यातील तिघांना जन्मठेप, त्यापैकी एकाला दुहेरी जन्मठेप तर पुरावा नष्ट करणाऱ्या आरोपीला सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे फिर्यादीसह दुसरा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाला असतानाही न्यायालयाने पोलिसांनी केलेला तपास न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपींच्या नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे आरोपींना शिक्षा ठोठावली आहे. 
 
घटनेची हकीकत अशी की, २३ आॅगस्ट २०१३ रोजी सिध्देश्वर देशमुख हे त्यांचे सहकारी अनिल अघमकर दिगंबर पाटील यांच्यासह दुचाकीने जात होते. यावेळी सिद्धेश्वर देशमुख दुचाकी चालवत होते. तर समोरून निलेश रामराव काळंके मोहन उर्फ बल्लू मार्कंड आले. त्यांनी त्यांची दुचाकी अडवली सिद्धेश्वर देशमुख यांच्यावर गोळी झाडली. त्यामुळे ते खाली पडले उठून ठाकूर यांच्या घराच्या दिशेने पळायला लागले. यावेळी निलेश काळंके बल्लू मार्कंड यांनी त्यांचा पाठलाग केला. निलेश काळंके याने चाकूने तर बल्लू मार्कंड याने पिस्तुलने डोक्यात छातीत तीन गोळा झाडल्या होत्या. त्यानंतर आरोपी पळून गेले होते. दरम्यान, सिद्धेश्वर देशमुख यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. 

या प्रकरणी खदान पोलिसांनी मोहन उर्फ बबलू मार्कंड, अविनाश सुरेश वानखडे, निलेश रामराव काळंके, विष्णु नारायण डाबके दिगंबर हरिभाऊ फाटकर यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२ (खून), ४४१ , १२० (ब) (कट रचणे), ५०६ ३४ आणि शस्त्रास्त्रे प्रतिबंधक अधिनियमनाचे कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल केला हाेता. या प्रकरणाचा तपास खदान पोलिस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार शैलेश सपकाळ, एएसआय हनुमंत वानखडे, अनिल धनभर, प्रकाश तायडे, जयंत सोनटक्के यांनी करत हत्येत वापरलेला चाकू पिस्तुल जप्त केली. तसेच न्यायदंडाधिकारी पोलिसांनी आराेपींचे बयाण घेतल्यानंतर न्यायालयात या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. 

न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. विनोद फाटे यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले अनिल अघमकर दिगंबर पाटील यांची साक्ष नोंदवली. मात्र हे दोघेही फितूर झाले. त्यानंतर अॅड. विनोद फाटे यांनी पोलिसांच्या बयाणावर विश्वास ठेवण्यासाठी आणि ते बयाण ग्राह्य धरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निर्णयाचा दाखला दिला तसेच हायकोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे २२ दाखले दिले. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायाधीश आर.जी. वाघमारे यांनी आरोपी अविनाश वानखडे, बल्लू मार्कंड निलेश काळंके यांना कलम ३०२, १२० ब, नुसार जन्मठेप प्रत्येकी२५ हजार रुपये दंड, आरोपी विष्णू नारायण डाबके याला पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली सात वर्षे सश्रम कारावास पाच हजार रुपये दंड, बल्लू मार्कंड निलेश काळंके यांना बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याबद्दल एक वर्षे शिक्षा प्रत्येकी पाच हजार रुपये दंड तसेच बल्लू मार्कंड याला आर्म अॅक्ट नुसार पुन्हा जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. इतकेच नव्हे तर बल्लू मार्कंड याला विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी सात वर्षे आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर कलम ५०६,३४१ मधून आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. विनोद फाटे यांनी तर आरोपीच्या वतीने औरंगाबाद येथील विधीतज्ज्ञ अॅड. लढ्ढा यांनी काम पाहिले. 

शिक्षा ऐकताच आरोपीची पत्नी कोसळली 
पतीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याचे शब्द कानावर येताच आरोपीची पत्नी न्यायालयाबाहेर कोसळली. यावेळी तिची दातखिळी बसली. शुद्धीवर आल्यानंतर पतीचा हात हातात घेऊन ती न्यायालयाच्या बाहेर पोलिसांच्या वाहनापर्यंत पोहचली होती. 
 
हत्याकांड पूर्वनियाेजित 
मलकापूर ग्रामपंचायतचे सरपंच सिध्देश्वर देशमुख हत्याकांड पूर्वनियोजित कट हाेता. आधी त्यांच्या शरीरावर मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने वार केले हाेते. या घटनेत ते बचावल्यानंतर हल्लेखोरांनी देशी कट्ट्यामधून तीन ते चार वेळा गोळीबार केला हाेता. यातील एक गोळी डोक्यात तीन गोळ्या छातीत घुसल्या हाेत्या. 

आरोपींना अविनाश वानखडेने दिले हाेते शर्ट 
हत्याकांडानंतर मार्कंड आणि काळंके एमआयडीसी परिसरात गेले. याठिकाणी त्यांनी घटनेच्या वेळी परिधान केलेले शर्ट काढले. त्यांना आरोपी अविनाश वानखडे याने नवीन दोन शर्ट दिले. हे शर्ट परिधान करुन दोघेही बोरगांव मंजूकडे दुचाकीने निघाले. तत्पूर्वी त्यांनी जुने शर्ट एमआयडीसी परिसरातच टाकले होते. 

तत्कालीन ठाणेदार सपकाळ यांनी केला हाेता तपास 
सिद्धेश्वर देशमुख हत्याकांडाचा तपास खदानचे तत्कालीन ठाणेदार शैलेश सपकाळ यांनी केला हाेता. राजकीय वैमनस्यापासून ते वैयक्तिक कारणांसह सर्वच अंगाने त्यांनी हत्याकांडाची माहिती संकलित करुन परिस्थितीजन्य पुरावे गाेळा केले हाेते. या प्रकरणाच्या तपासात एएसआय हनुमंत वानखडे, प्रकाश तायडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल अनिल धनभर, जयंत सोनटक्के यांनी आराेपीला शिक्षा व्हावी यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली हाेती. त्यांना तत्कालीन पोलिस अधीक्षक विरेंद्र मिश्र उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह जाधव यांनी मार्गदर्शन केले होते. 
 
असा होता आरोपी विष्णू डाबकेचा सहभाग 
बल्लू मार्कंड आणि निलेश काळंके हे बोरगाव मंजूकडे दुचाकीने निघाले. त्यांनी एमआयडीसी परिसरात विष्णू डाबकेला बोलाविले. या दोघांनी त्याच्याजवळ हत्याकांडात वापरलेली शस्त्र कापडात गुंडाळून दिली.त्यानंतर कापडामध्ये शस्त्र असल्याचे डाबकेच्या लक्षात आल्याने त्याने ते कुंभारीच्या तलावात फेकलेे हाेते. विष्णू हा गॅस रिफिलिंगच्या व्यवसायातून मार्कंडच्या संपर्कात आला होता. 

कुंभारीच्या तलावातून केले होते शस्त्र जप्त 
हत्याकांडात आरोपींनी वापरलेली पिस्तूल आणि चाकू ३० ऑगस्टला कुंभारी येथील तलावामधून हस्तगत करण्यात आले. आरोपीने वापरलेली पिस्तूल आणि चाकू फेकून दिले होते. पोलिसांनी शस्त्र शोधून काढण्यासाठी दोन ट्युबसह पट्टीचे पोहणाऱ्या युवकांना तलावात उतरविले. दोन चमूने दोरीला लोहचुंबक बांधून शस्त्रांचा शोध घेतला. हे शस्त्र लोहचुंबकाला चिकटले हाेते. 

आरोपींना शिक्षेसाठी महत्त्वाचे ठरले हे जबाब 
हत्याकांडातील दोन साक्षीदारांचे सप्टेंबर रोजी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अन्वये न्यायालयात जबाब नोंदवण्यात आले हाेते. त्यामुळे हत्याकांडातील तपास आणि भविष्यातील खटल्याला बळकटी मिळाली. फौजदारी प्रक्रिया संहितेन्वये न्याय दंडाधिकारी कबुली जबाब किंवा जबाब नोंदवू शकतो. कबुली जबाब किंवा जबाब नोंदवणारा खटल्याच्यावेळी उलटल्यास जबाब महत्त्वाचा ठरतो, तो सोमवारी ठरला. 

न्यायदंडाधिकारी पोलिसांचे बयाण महत्त्वाचे 
^फिर्यादीसह प्रत्यक्ष साक्षीदार फितूर झाले हाेते. तपास अधिकारी सपकाळ, मृतकाची पत्नी विद्या देशमुख, पंच म्हणून नितीन देशमुखसह १५ साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावे न्यायदंडाधिकारी पोलिसांचे बयाण ग्राह्य धरून आरोपींना न्यायालयाने शिक्षा ठोठावली.’’ -अॅड. विनोद फाटे, सहाय्यक जिल्हा सरकारी वकिल 

निलेश काळंके : सिद्धेश्वरदेशमुख यांच्यावर चाकूने हल्ला केला. दुसरा आरोपी बल्लू मार्कंडला शेवटची गोळी चालविण्यासाठी निलेशने उत्तेजित केले होते. काळंकेवर सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. यामध्ये १९९९ मध्ये जबर मारहाण आणि हत्या (या गुन्ह्यातून त्याची निर्दोष सुटकाही केली गेली), २००१ मध्ये प्राणघातक हल्ला, २००५ मध्ये जबर मारहाण,२००८ मध्ये दंगल आणि तोडफोड करणे, २०१० मध्ये मारहाण करुन पैसे लुटण्याच्या गुन्ह्याचा समावेश आहे. निलेश हा ग्रामपंचायत पोट निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आला हाेता. 

बल्लूउर्फ मोहन मार्कंड : सिद्धेश्वरदेशमुख यांच्यावर बल्लू मार्कंडने गोळीबार केला होता. बल्लू यापूर्वी सीमा सुरक्षा दलामध्ये (बीएसएफ) कार्यरत होता. निवृत्त होण्यापूर्वीच तो बीएसएफमधून आला होता. 

अविनाश वानखडे : वानखडेच हत्याकांडाचा सूत्रधार हाेता.कट रचल्याचा आरोप अविनाश वानखडेवर हाेता. तो ग्रामपंचायतचा माजी सरपंच हाेता. २०१० च्या निवडणुकीत तो ग्रामपंचायत सदस्य म्हणूनही निवडून आला होता. दरम्यान, भारिप-बमसंने त्याला महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिली नव्हती. 
बातम्या आणखी आहेत...