आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलशुद्धीकरण केंद्रात सहा पंप झाले दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खरेदी करण्यात आलेले सहा पंप पुणे येथून महान येथील जलशुद्धीकरण केंद्रात दाखल झाले आहेत. मोटार हुबळी येथून पुढील आठवड्यात अकोल्यात दाखल होणार असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पंप मोटार कार्यान्वित होतील. त्यामुळे पाणीपुरवठ्यात सर्वात महत्त्वाची अडचण दूर होणार आहे.
पाणीपुरवठा योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र महान येथे आहे. या जलशुद्धीकरण केंद्रात १९९८ ला पाच पंप बसवण्यात आले. या पंपांची वयोमर्यादा १५ वर्षे आहे. परंतु, पंप बसवून १६ पेक्षा अधिक वर्षे झाली आहेत. महापालिकेने योजना ताब्यात घेतल्यानंतर पंप मोटारच्या देखभाल दुरुस्तीकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे मागील एक वर्षापासून सतत पंप जळण्याचे प्रकार वाढले आहे. यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने पंप मोटार खरेदी करण्यासाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. महापालिकेने दोन कोटी ३० लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवला होता. राज्य शासनाने एक कोटी ६१ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला. यात महापालिकेला दहा टक्के लोकवर्गणीचा वाटा टाकावा लागला. पंप मोटार खरेदीची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे देण्यात आली होती. मजीप्राने निविदेसह उर्वरित प्रक्रिया पूर्ण केल्यावर एका कंपनीकडून हे पंप मोटार खरेदी करण्यात आले. पुणे येथे पंपाची ट्रायल घेतल्यानंतर हे सहाही पंप नुकतेच महान येथे दाखल झाले आहेत, तर मोटारची टेस्टिंग पूर्ण झाली असून, मोटार पुढील आठवड्यात अकोल्यात दाखल होतील. त्यामुळे डिसेंबरच्या पुढील आठवड्यात पंप मोटार कार्यान्वित होतील, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

पाणीपुरवठ्यातील व्यत्यय संपणार
जलशुद्धीकरण केंद्रातील पाचही पंप जुने झाले आहेत. यापैकी तीन पंप सुरू आहेत. यापैकी दोन पंप नियमितपणे चालवले जातात, तर एक पंप राखीव ठेवला जातो. परंतु, एकाच वेळी दोन पंप नादुरुस्त झाल्यास पाणीपुरवठ्यात व्यत्यय येतो. वर्षभरापासून हा त्रास अकोलेकर सहन करीत आहेत. परंतु, आता सहा पंप खरेदी करण्यात आल्याने तीन पंपांचा एकाच वेळी वापर केला तरी तीन पंप राखीव ठेवले जाणार आहेत. त्यामुळे पंप बिघडल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय होणे आता कायमस्वरूपी थांबणार आहे.