आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिका निवडणुकीपूर्वी शहराच्या राजकारणात जोरदार उलथापालथी होण्याचे संकेत मिळाले आहेत. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बमसं आदी सर्वच पक्षातील विद्यमान नगरसेवक तसेच कार्यकर्ते आयाराम-गयारामची तयारी करत आहेत. काँग्रेसचे अनेक नगरसेवक तसेच कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याची अधिक शक्यता असल्याने तसेच एमआयएमने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केल्याने काँग्रेसला महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महापालिकेचे राजकारण तीन ते चार नेत्यांभोवती फिरते. या नेत्यांमध्ये स्वत:च्या भरवशावर नगरसेवक निवडून आणण्याची धमक असलेले नेतेही आहेत. अशा नेत्यांनी खांदेपालट केला की महापालिकेच्या राजकारणातही बदल होतो. याचा अनुभव यापूर्वीही अकोलेकरांनी घेतला आहे. शिवसेनेतून विजय देशमुख काँग्रेसमध्ये गेले. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या नऊवरून थेट १८ वर गेली, तर शिवसेनेची १३ वरून आठवर आली. विजय देशमुख यांनी महापालिकेत काँग्रेसची सत्ता स्थापनेतही महत्त्वाची भूमिका बजावली, परंतु काँग्रेसने विधानसभेत त्यांची उमेदवारी कापली. परिणामी, विजय देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी खेचून आणली तसेच दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन काँग्रेसच्या उमेदवाराची अनामत जप्त केली.

आता राष्ट्रवादी काँग्रेसने विजय देशमुख यांच्यावर जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) ची जबाबदारी सोपवली आहे, तर येत्या काही दिवसांत महानगराध्यक्षाची निवड होणार आहे. देशमुख यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद आल्याने त्यांचीही जबाबदारी वाढली. देशमुख कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांना मानणारा गट त्यांच्यासोबत कायम असतो. त्यामुळेच तूर्तास कोणत्याही नगरसेवकाने अथवा कार्यकर्त्याने काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नसला तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे.

एमआयएमचीही मोर्चेबांधणी
औरंगाबादनंतरएमआयएम आता अकोला महापालिकेच्या राजकारणात प्रवेश करणार आहे. युडीएफ, समाजवादी पक्ष, डेमोक्रॅटिक पक्ष, जनता दल आदी लहान पक्षातील नगरसेवक, कार्यकर्ते एमआयएममध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यात एेनवेळी काँग्रेसचे नगरसेवकही प्रवेश घेऊ शकतात.

पद जाण्याचा धोका
पक्षसोडून इतर पक्षात प्रवेश केल्यास नगरसेवक पद धोक्यात येण्याची शक्यता तसेच महापालिका निवडणुकीला किमान दीड वर्ष अवधी असल्यानेच पक्ष प्रवेश लांबणीवर पडला आहे. हा सर्व बदल आचारसंहिता लागू होण्यापूर्वी होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
सगळ्याच पक्षात उलथापालथ : केवळपक्ष सोडून जाणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे नगरसेवक, कार्यकर्त्यांची संख्या अधिक असेल. तसेच भारिप-बमसंच्या दोनपैकी एक राष्ट्रवादी काँग्रेस तर दुसरा भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. भाजपचा एक विद्यमान माजी नगरसेवकही पक्षाने उमेदवारी नाकारल्यास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची मानसिकता तयार केली आहे. तर, काँग्रेसचे सहा ते आठ विद्यमान नगरसेवक तसेच काही माजी नगरसेवक ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगरसेवकांपैकी एक भाजप तर दुसरा एमआयएममध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.