आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीस वर्षांमध्ये पाव हिश्शावर आला कापूस, सोयाबीन नऊपट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नगदी पीक किंवा पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाच्या पेऱ्यात गेल्या दोन दशकांत कमालीची घट नोंदली गेली असून, १९९६ च्या तुलनेत या पिकाचा पेरा अवघा एक चतुर्थांशवर (पाव हिस्सा) आला आहे. त्याच वेळी तेलबिया प्रकारात मोडणाऱ्या सोयाबीनने चांगलीच उचल घेतली असून, या पिकाचे पेरणी क्षेत्र तब्बल नऊपट झाले आहे.
पीक-पेऱ्यात मोठ्या प्रमाणात झालेला हा बदल कृषितज्ज्ञांचा डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ठरला असून, शेतकऱ्यांच्या अर्थचक्रालाही त्यामुळे खीळ बसली अाहे. पीक पद्धतीतील या आमूलाग्र बदलामुळे विविध प्रकारचे दुष्परिणाम पुढे आले आहेत. कापसाप्रति असलेली सत्ताधाऱ्यांची उदासीनता, लोकप्रतिनिधींची अनास्था आणि नव्या औद्योगिक धोरणाचा परिणाम, यामुळे असे घडले, असे या बदलामागचे कृषितज्ज्ञांचे निरीक्षण आहे.

कृषी विभागाकडे उपलब्ध आकडेवारीनुसार सन १९९६-९७मध्ये जिल्ह्यात तीन लाख ६२ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात कपाशीची पेरणी करण्यात आली होती. गत वर्षी (सन २०१५-१६ मध्ये) हा आकडा केवळ ९९ हजारांवर स्थिरावला. अर्थात वीस वर्षांत कापसाचा पेरा अवघा पाव हिश्शावर (एक चतुर्थांश) येऊन ठेपला आहे.

याउलट सोयाबीन पिकाने उंच उडी घेतली आहे. सन १९९६-९७ मधील हंगामात जिल्ह्यात २४ हजार २०० हेक्टर जमिनीत सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. आजघडीला ती वाढून थेट लाख २९ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर पोहोचली आहे. वीस वर्षांनंतरचा हा बदल संख्याशास्त्राचा आधार घेऊन मोजला, तर तो सन १९९६-९७ च्या तुलनेत तद्दन नऊपट जास्त आहे. विशेष असे की, कापसासाठी सुपीक जमीन असतानाही विदर्भात या पिकाच्या अशा वाताहतीमुळे शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

पीक पद्धतीतील या बदलामुळे त्यांचे वैभव गमावले गेले. कौटुंबिक विपन्नावस्था निर्माण झाली. त्यातूनच पुढे इतर प्रयोग करताना अनेकांना सोयाबीनचा आश्रय घ्यावा लागला, असे शेतीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. परंतु, गेल्या काही वर्षांतील अनुभव लक्षात घेता आता हे पीकही परवडेनासे झाले असून, शासन कृषितज्ज्ञांनी ठळक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पुढे आली आहे.

उत्पादनातही घटच
१९९६-९७ साली कपाशीचे उत्पादन लाख ३२ हजार ६०० मेट्रीक टन एवढे विक्रमी झाले होते. परंतु, गतवर्षी हा आकडा ९३ हजार ८०० मेट्रीक टनपर्यंत खाली घसरला.
गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन ९१ हजार ३०० मेट्रीक टन झाले. अवर्षणामुळे हा आकडा कमी झाला एरवी २०१२-१३ साली लाख २२ हजार मेट्रीक टन सोयाबीन झाले आहे. १९९६-९७ ला मात्र, या पिकाचे उत्पादन अवघे ४८ हजार ३०० मेट्रीक टन एवढे कमी होते.

हे सत्ताधाऱ्यांचेच कटकारस्थान
^कापूसाला हद्दपार करण्याचे कटकारस्थान सत्ताधाऱ्यांनीच केले आहे. आधी गिरण्या बंद पाडल्या. त्यानंतर एकाधिकार मोडीत काढला. आता दर पाडण्याचे काम सुरू अाहे. याचीची मोठी किंमत त्यांना मोजावी लागणार आहे.'' कॉ. तुकाराम भस्मे,अ.भा. किसानसभेचे पदाधिकारी.

सन २०१४-१५ मध्ये सोयाबीनचा विक्रम
सोयाबीनचे वीस वर्षांतील आकडे डोळे विस्फारून सोडणारे आहेत. सन १९९६-९७ पासून तीन वर्षे ते सलग वाढले. मात्र, सन १९९९-०० मध्ये पुन्हा घटले. ही घट-वाढ सलग चार वर्षे सुरू होती. सन २००४-०५ मध्ये या पिकाने पुन्हा उचल घेतली. या क्रमात सन २०१४-१५ मध्ये सोयाबीनचे क्षेत्र लाख ३३ हजार १०० हेक्टरवर पोहोचले.

पुढे काय? : यावर्षी पाऊस वेळेवर आणि पुरेसा येण्याचा अंदाज असल्याने शेतकरी साेयाबीनच्याच बियाणांची मागणी करतील, असे बियाणे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.