आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फवारणीचे 19 बळी; 4 जण व्हेंटिलेटरवर; कृषी राज्यमंत्र्यांकडून यवतमाळ जिल्ह्यात पाहणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारताना १८ शेतकरी-मजुरांच्या मृत्यूचे प्रकरण गाजत असताना उपचारादरम्यान मंगळवारी अाणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. एकूण बळींची संख्या १९ वर पोहोचली. ३६९ जण उपचार घेत आहेत. आणखी ४ जण व्हेंटिलेटरवर आहेत. 
 
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी यवतमाळला भेट दिली. मृतांना मदत जाहीर केलेली आहे. बाधितांनाही आर्थिक मदत मिळावी. गावा-गावात शेतकऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. 

खोतांवर प्रतीकात्मक फवारणी शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री खोत यांच्यावर प्रतीकात्मक फवारणी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी काळ्या फिती लावून सरकारविरोधात  घोषणाबाजीही करण्यात आली. 

दरम्यान, ‘दिव्य मराठी’च्या पाहणीत बुलडाणा जिल्ह्यातही ११, अकोल्यात ८ जण फवारणीत बळी गेले असून ६०० वर रुग्ण अजूनही उपचार घेत असल्याची माहिती उघडकीस आली आहे.
याबाबत यवतमाळच्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. बाबासाहेब येलके म्हणाले, वातावरण दमट आहे. फवारणी करताना शेतकरी अनेक प्रकारची कीटकनाशके मिसळून वापरत आहेत. त्यातील काही घातक तत्त्वे त्वचेवर चिटकत आहे. घाम व श्वसनाच्या माध्यमातून त्यांचे सूक्ष्म कण फुप्फुसात जाऊन त्यावर थर जमत आहे.
 
प्रतिबंधित असलेल्या  कीटकनाशकांचा वापर
पूर्वी अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने बंदी घातलेले बियाणे यंदा यवतमाळ व परिसरातील जिल्ह्यांत विकण्यात आले. त्यामुळे अळ्यांचे प्रमाण वाढले. पुन्हा त्यावर प्रतिबंधित तीव्र कीटकनाशकांचीच फवारणी होत आहे. यातून शेतकऱ्यांना विषबाधा होत आहे. या सर्व प्रकाराला संबंधित कंपन्या व कृषी विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी शेतकरी मिशनचे किशोर तिवारी यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...