अकोला - बाळापूरलाएसटी बस थांबते काय, अशी विचारणा केली असता बसच्या वाहकाने अल्पवयीन मुलाला मारहाण केली. ही घटना बुधवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मुख्य बसस्थानकावर घडली.
बाळापूर येथील एक १६-१७ वर्षाचा मुलगा त्याची आई दुपारी अकोला बस स्थानकावर बाळापूरला जाण्यासाठी आले होते. शेगावसाठी एक बस उभी होती. ही बस बाळापूरला थांबते काय, अशी विचारणा या मुलाने बसच्या वाहकाला केली. मात्र बसचा वाहक त्याच्या मित्रांशी बोलण्यात दंग असल्यामुळे मुलाकडे त्याने लक्ष दिले नाही. पुन्हा या मुलाने त्यास विचारले असता वाहकाचा पारा चढला. त्याने त्या मुलाला धमकावत त्याच्यावर हात उगारला. त्याची आई मध्ये आली असता या दोन्ही मायलेकांना घेऊन हा वाहक त्यांना पोलिस चौकीत घेऊन गेला. तेथे मुलाला त्याच्या आईसमक्ष दोन-चार चापटा लगावल्या. गर्दी पाहून त्याने पोलिस चौकीचे दार बंद करून त्याला पुन्हा मारहाण केली त्याचीच तक्रार करण्याची धमकी दिली. मात्र, बस स्थानकावर असलेल्या काही समजूतदार एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करीत वाहकाला समजावले.