आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडन करून शासनाचा निषेध, चौथ्या दिवशीही प्रवाशांचे झाले हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी आणि इतर आनुषंगिक मागण्यांसाठी सुरु असलेला एस. टी. कर्मचाऱ्यांचा संप आज, शुक्रवारी चौथ्या दिवशीही कायम राहिला. नाराज कर्मचाऱ्यांनी जनजागरण फेरी, घंटानाद व मंुडन करुन राज्य शासनाचा निषेध नोंदवला. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आल्याने उद्या शनिवारी संप मिटण्याची शक्यता बळावली आहे. 
 
म. रा. एसटी कामगार संघटना, इंटक व इतर संघटनांनी मिळून संयुक्तपणे या आंदोलनाची हाक दिली आहे. संपामुळे मंगळवार, १७ ऑक्टोबरपासूनच एसटीची चाके थांबली आहेत. ऐन दिवाळीच्या दिवसांत हे आंदोलन झाल्याने सणा-सुदीला ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. शिवाय एसटीची लाखो रुपयांची उलाढालही ठप्प पडली. ही बाब जनसामान्यांना कळावी म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी सकाळी मध्यवर्ती बसस्थानकातून फेरी काढली.जुन्या बसस्थानकाला वळसा घालून परत त्याच ठिकाणी विसर्जित केली. रॅलीत विविध संघटनांचे चालक, वाहक, लिपीक यांच्यासह यांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. 
 
सकाळच्या फेरीनंतर दुपारी याच कार्यकर्त्यांनी शासनाला जागे करण्यासाठी घंटानाद केला. त्यानंतर मध्यवर्ती बसस्थानकातील आंदोलनस्थळीच मुंडनही केले. एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव अविनाश जहागीरदार, इंटकचे अनिल गरड, इतर पदाधिकारी जयंत देशमुख, गणेश मांजरे, सुधीर मोरेकर, रुपम वाघमारे, दिलीप भिसे, खामगाव आगारचे कर्मचारी गजानन ठाकरे व स्वप्नील आमटे, पी. पी. ढवळे, जी. एस. आगरे यांच्यासह सुमारे २० कार्यकर्त्यांनी मुंडन आंदोलनात सहभाग घेतला. 

‘महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी आयोग संयुक्त कृती समिती’च्या नावाखाली हे आंदोलन केले जात असून मागण्या मान्य होईस्तोवर माघार घ्यायची नाही, असा संबंधितांचा संकल्प आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीशिवाय वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी द्या, खासगी बसेस भाड्याने घेण्याचा निर्णय रद्द करा, चालक-कम-वाहक संकल्पना रद्द करा, अन्यायकारक परिपत्रके रद्द करा या मागण्याही  या  आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात   आल्या आहेत.

स्थानिक पातळीवर महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे विभागीय सचिव अरविंद जहागीरदार, विभागीय अध्यक्ष के. एस. चांदुरकर, डेपो अध्यक्ष राजीक देशमुख, कार्याध्यक्ष प्रदीप गावंडे, सचिव सचिन हाताळकर आदी पदाधिकारी या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. परगावाहून आलेल्या कर्मचाऱ्यांची सोय म्हणून त्यांच्यासाठी सामुहिक खिचळीची सोयही आंदोलनस्थळी करण्यात आली आहे.
 
पर्यायी व्यवस्था पुरेशी नाही : प्रवाशांचे हाल टळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने स्कुल बस व इतर वाहनांची मदत घेत पर्यायी उभी केली. परंतु अकोट आणि जवळपासची गावे सोडल्यास ही सेवा इतर शहर-गावांसाठी वापरली जात नाही. त्यामुळे अमरावती, नागपूर व वाशिमसह इतर तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्यांना दामदुप्पट भावात खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.  
बातम्या आणखी आहेत...