आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्थायी’च्या अंदाजपत्रकाला मंजुरी, विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या कल्लोळामुळे सभा घेतली आटोपती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विविध कामे करण्यासाठी तरतूद केलेला दहा लाखांचा निधी खर्च होण्याची हमी द्या, यावरच विरोधी गटातील नगरसेवक अडून बसले. विरोधी पक्षातील नगरसेवकांच्या कल्लोळामुळे अंदाजपत्रकावर कोणतीही चर्चा करता स्थायी समितीने २०१६-२०१७ च्या अंदाजपत्रकात सुचवलेल्या बदलांसह १८ एप्रिलला झालेल्या महासभेत अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली.
प्रशासनाने २०१६-२०१७ चे अंदाजपत्रक मंजुरीसाठी स्थायी समितीने पाठवले होते. स्थायी समितीने १८ मार्चला झालेल्या सभेत प्रशासनाने पाठवलेल्या विविध बदलांसह या अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. स्थायी समितीने सुचवलेल्या बदलासह दुरुस्ती करून अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे पाठवण्यात आले. अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी ११ एप्रिलला महासभा बोलावण्यात आली. परंतु, ही सभा दहा एप्रिलला तोंडी आदेश देऊन तहकूब करण्यात आली. ही तहकूब सभा १८ एप्रिलला घेण्यात आली. सभेला सुरुवात होताच स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी स्थायी समितीने सुचवलेले बदल महासभेसमोर मांडले. स्थायी समितीने प्रत्येक नगरसेवकाला त्याच्या प्रभागात लहानसहान परंतु तातडीची कामे करता यावी, यासाठी दहा लाख रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली. या तरतुदीवरूनच महासभेत गदारोळ सुरू झाला. माजी महापौर मदन भरगड यांनी स्थायी समितीने सुचवलेल्या बदलांचे कौतुक केले. परंतु, अंदाजपत्रकात विविध कामांवर केली जाणारी तरतूद काही महिन्याच संपुष्टात येते, हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे केवळ तरतूद करता केलेल्या तरतुदीचा वापर झाला पाहिजे, अन्यथा अशी तरतूद करूच नका, अशी मागणी केली. कारण नागरिकांनी सांगितलेली लहानसहान कामे जर होत नसतील तर त्यांनी महापालिकेच्या कराचा भरणा का करावा, असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. तर, नगरसेवकांसाठी दहा लाख रुपयांची केलेली तरतुदीतून कामे केली जातील, याची हमी प्रशासनाने द्यावी, अशी जोरदार मागणी केली. ही मागणी विरोधी पक्षनेता, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता राजकुमार मुलचंदानी आदींनी उचलून धरली. स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी हा निधी वर्षभर टप्प्याटप्प्याने खर्च केला जाईल, असे आश्वासन दिले. तर, आयुक्त अजय लहाने यांनीही टप्प्याटप्प्याने काम केले जाईल, अशी हमी घेतली. परंतु, विरोधक कामे होतील की नाही, याचे उत्तर होय अथवा नाही या स्वरूपात द्या, असा हट्ट धरून बसले. यामुळे सभागृहाचे कामकाज केवळ याच मुद्द्यावर रखडले. या विषयावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेत्यांनी २० एप्रिलला होणाऱ्या सभेची तयारी करून या, असा इशारा वजा धमकी दिली. विरोधी पक्षाचे नगरसेवक महापौरांच्या राजदंडापर्यंत पोहोचून मोठमोठ्याने कल्ला करू लागल्याने महापौर उज्ज्वला देशमुख यांनी २०१६-२०१७ च्या अंदाजपत्रकाला सभागृह मंजुरी देत असल्याचे जाहीर करत राष्ट्रगीत सुरू केले.

तुम्ही स्वच्छ म्हणजे इतर तसे नाही
माजी महापौर मदन भरगड यांनी आयुक्तांना ११ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीतील सुरू असलेली कामे दाखवल्याबद्दल नाराजी व्यक्त करत तुम्ही एकटे स्वच्छ आहात, ही बाब मान्य. परंतु, तुम्ही एकटे स्वच्छ, चांगले म्हणजे संपूर्ण जग चांगले, असे होत नाही. त्यामुळेच तुम्हाला अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात अपयश आल्याची थेट टीका केली.

इतरांना बोलताच आले नाही
अंदाजपत्रका सारख्या विषयावर चर्चा होणे गरजेचे होते. महासभेत बोटावर मोजण्याइतके नगरसेवक या विषयावर बोलतात. त्यांनी तयारीही केली होती. यात विरोधी पक्षातील नगरसेवकांचाही समावेश होता. परंतु, विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केलेल्या कल्लोळामुळे जे नगरसेवक तयारी करून आले होते, त्यांना बोलता आल्याने त्यांचा हिरमोड झाला.
सभापती विजय अग्रवाल यांनी अंदाजपत्रक महापाैरांकडे सादर केले.
बातम्या आणखी आहेत...