आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Start Debate In Commissioner And Corporators In Akola

आयुक्त नगरसेवकांमध्ये ‘नदी की पहाड’चा खेळ सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेलाकाही दिवसांपूर्वी कुस्तीचा आखाडा म्हटल्या जात होते. तूर्तास काही प्रमाणात आखाडा बंद झाला असला, तरी आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये वाद सुरूच आहेत. या वादाला टाळण्यासाठी पाठ शिवणीचा खेळ खेळला जात असे. परंतु, तूर्तास या खेळाऐवजी आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये ‘नदी की पहाड’ हा खेळ खेळला जात आहे, तर दुसरीकडे नगरसेवक एकमेकांसोबत धाबाधुबीचा खेळ खेळत आहेत. त्यामुळे तूर्तास महापालिका कार्यालय खेळण्याचे केंद्र बनले आहे.
महापालिका आयुक्त आणि नगरसेवक यांच्यात कधीच जुळले नाही. कडक आयुक्त आला तरी नाराजी, काम करणारा आयुक्त आला तरी नाराजी, सर्वांना समजून घेणारा आयुक्त आला तरी नाराजी, असा प्रकार महापालिकेत पाहावयास मिळतो. विद्यमान आयुक्त सोमनाथ शेटे यांच्यावर नगरसेवक टक्केवारीचा आरोप करत आहेत. आयुक्त टक्केवारी शिवाय दुसरे कामच करत नाहीत, असेही थेट बोलले जाते. त्यामुळेच काही नगरसेवक आणि आयुक्त यांच्यात सतत वाद सुरू झाले आहेत. आयुक्त महापालिका कार्यालयात पोहोचले की, लगेच त्यांच्या कक्षात गराडा घातला जातो. या गराड्यात स्वच्छतेपासून ते नाला सफाई एवढेच नव्हे, तर प्रशासकीय अधिकार असलेल्या बदल्यांचीही चर्चा केली जाते. या प्रकारामुळे आयुक्तांना दैनंदिन कामकाज करता येत नाही. अखेर आयुक्त हुतात्मा स्मारकाचा रस्ता धरतात. काही तत्कालीन आयुक्तांनी तर हुतात्मा स्मारकातच आपले कार्यालय थाटले होते.

विद्यमान आयुक्त सोमनाथ शेटे यांनीही हा फंडा स्वीकारला आहे. मात्र, आयुक्त सोमनाथ शेटे हे नियमाने महापालिका कार्यालयात येतात. सकाळी साडेनऊ ते दहा यादरम्यान आयुक्त कार्यालयात पोहोचतात. दीड एक तास कार्यालयीन कामकाज केल्यानंतर नगरसेवकांची गर्दी वाढायच्या आतच मागच्या दाराने आयुक्त निघून जातात. यादरम्यान, आयुक्त महापालिकेत आल्याची चर्चा नगरसेवकांमध्ये होते. दोन-चार नगरसेवक एकत्र यायच्या आधीच आयुक्त निघून जात असल्याने नगरसेवक संतप्त होतात. आयुक्तांचे महापालिका कार्यालयात येणे म्हणजे एक प्रकारे ‘नदी की पहाड’ या लहानपणीच्या खेळातील ‘आम्ही तुमच्या नदीत’ असे म्हणून आव्हान देण्यासारखे ठरत आहे, अशी चर्चाही महापालिकेत सुरू आहे. आयुक्त महापालिका कार्यालयात आल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरसेवक एकत्र येऊन कार्यालयात पोहोचत नाही, तोपर्यंत आयुक्त महापालिकेच्या मागच्या दाराने हुतात्मा स्मारकात जाऊन एक प्रकारे ‘आम्ही तुमच्या पहाडावर’ असे आव्हानच आपल्याला देतात, अशी भावनाही नगरसेवकांमध्ये निर्माण झाली. हुतात्मा स्मारक गाठेपर्यंत आयुक्त तेथून दुस-या ठिकाणी गेलेले असतात. त्यामुळे आयुक्तांनी सुरू केलेल्या ‘नदी की पहाड’ या खेळाने नगरसेवक आणि आयुक्तांची भेट होत नसल्याने नगरसेवक मात्र, चांगलेच त्रस्त झाले आहेत. महापालिकेत होणा-या या खेळात ‘बिच्चा-या’ नगरसेवकांना दररोज हार पत्करावी लागत होती.

कळीचामुद्दा ठरले शिक्षणाधिकारी
शिक्षणाधिकारी डॉ. शाहिन सुलताना शाळा प्रवेशाच्या दिवशी गैरहजर होत्या. याबाबत उपमहापौरांसह महापालिकेतील पदाधिकारी आणि पालकमंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली होती. आयुक्त सोमनाथ शेटे यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिक्षणाधिकारी डॉ. शाहिन सुलताना यांना निलंबित केले. शिक्षणाधिकारी शाहिन सुलताना यांना निलंबित केल्यानंतर विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण यांनी प्रशासनावर आगपाखड केली होती. शिक्षणाधिका-यांवर निलंबनाची कारवाई का? असा प्रश्न उपस्थित करून शिक्षणाधिका-यांचे निलंबन मागे घ्या, यासाठी दबावतंत्राचा वापर केला. अखेर आयुक्तांनी आपला निर्णय मागे घेत, शिक्षणाधिकारी शाहिन सुलताना यांचे निलंबन मागे घेतले. जुलैला शिक्षणाधिकारी यांच्यासोबतच लेखापाल अरुण पाचपोर यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु, आयुक्तांनी केवळ शिक्षणाधिकारी यांचेच निलंबन मागे घेतले.
याचा जाब विचारण्यासाठी सभागृह नेते योगेश गोतमारे, उपमहापौर विनोद मापारी, शरद तुरकर यांच्यासह नगरसेवकांनी आयुक्तांना घेरले होते. या वेळी आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये जोरदार वादही झाला. अखेर आयुक्तांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारातून कशीबशी स्वत:ची सुटका करून घेतली.

नगरसेविकाही पोहोचली काठी घेऊन मनपात
प्रभागातस्वच्छता होत नसल्याचा तसेच कचरा उचलला जात नसल्याने त्रस्त झालेल्या राजेश्वरी अम्मा यांनी १० जुलैला काठी घेऊनच महापालिका गाठली. स्वच्छता विभाग गाठून संबंधित अधिका-याला जाब विचारला. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली होती. शहरात मागील काही दिवसांपासून अनेक भागातील स्वच्छता करण्यात अालेली नाही. त्यामुळे स्वच्छतेकडे लक्ष दणे गरजेचे अाहे.

नगरसेवकांमध्ये धाबाधुबी
एकीकडेआयुक्त आणि नगरसेवकांमध्ये ‘नदी की पहाड’ हा खेळ खेळला जात आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी गटातील गटबाजी अद्यापही संपलेली नाही. सत्ताधा-यांच्या या गटबाजीत विरोधी पक्षातील नगरसेवक मात्र, आपली हौस पूर्ण करत आहेत. या गटबाजीच्या खेळालाच आता महापालिकेत धाबाधुबी संबोधले जात आहे. सत्ताधारी गटातील नगरसेवक एकमेकांना बाद करण्याच्या प्रयत्नातच आपला वेळ खर्ची घालत आहे. त्यामुळे तूर्तास महापालिका ख-या अर्थाने मनोरंजनाचे साधन बनले आहे.

... अन् आयुक्त झाले आऊट
आयुक्तत्यांच्या कक्षातून मागील दाराने महापालिकेच्या मागच्या प्रवेशद्वारातून वाहनातून निघून जातात, ही बाब स्पष्ट झाल्यावर आयुक्तांची चांगलीच फसगत झाली. आयुक्त त्यांच्या कार्यालयात बसल्यानंतर सभागृह नेते योगेश गोतमारे आयुक्तांच्या कक्षात जाता त्यांनी मागच्या गेटला थेट कुलूप ठोकले. त्यामुळे आयुक्त ज्या वेळी त्यांच्या कार्यालयाच्या मागील दरवाजाने येऊन वाहनात बसले त्या वेळी गेटला कुलूप ठोकल्यामुळे आयुक्तांना मुख्य प्रवेशद्वारातून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे या खेळात नगरसेवकांनी प्रथमच आयुक्तांना आऊट केले.