आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stones Pelted On Encroachment Squad In Tajanapeth

अतिक्रमणविरोधी पथकावर ताजनापेठमध्ये दगडफेक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गणेश विसर्जन मार्गावरील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर तेथील काही जणांनी दगडफेक केली. यामध्ये दोन वाहनांच्या काचा फुटल्या. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

रविवारी गणेश विसर्जन असल्यामुळे अतिक्रमणविरोधी पथकाने गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. या वेळी त्यांना ताजनापेठमधील मच्छी मार्केटमध्ये सिमेंटचा ओटा मार्गात अडसर असल्याचे दिसून आले. त्यांनी त्या ओट्यावर जेसीबी चढवल्यानंतर तेथील जमावाने विरोध केला. मात्र, महापालिका प्रशासन कारवाई करण्यावर ठाम असल्यामुळे त्यांनी कारवाई केली. त्यामुळे अचानक दगडफेक झाली. त्यामध्ये जेसीबी आणि अतिक्रमणविरोधी विभागाच्या एका ट्रकच्या काचा फुटल्या. यामध्ये कुणीही जखमी झाले नाही. काही वेळ या भागात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वातावरण शांत झाले. याप्रकरणी महापालिका आरोग्य निरीक्षक राजेश शंकर पथरोड यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये कालूभाई आणि बब्बूभाई या दोघांच्या विरोधात भादंवि ३५३, १८६, ४२७, ३३६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
दरम्यान, शहरातील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर दगडफेकीमुळे या भागात तगडा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
ताजनापेठ येथे दगडफेकीनंतर तैनात करण्यात आलेला पोलिस बंदोबस्त.