आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिव्हायडरमध्ये दुतर्फा लागतील पथदिवे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील गजबजलेल्या मार्गावरील विस्कळीत वाहतूक सुरळीत करण्याच्या हेतूने रस्त्याची रुंदी, तसेच डिव्हायडर टाकण्याचा निर्णय घेणारे आयुक्त अजय लहाने यांनी आता काँक्रिटीकरणाच्या तीन मार्गांवर अत्याधुनिक पथदिवे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्तांचा हा निर्णय पुन्हा एकदा त्यांची दूरदृष्टी सिद्ध करणारा ठरला आहे. या निर्णयामुळे शहरातील तीन मार्ग का होईना, लख्ख दिव्याने झगमगणार आहेत.

राज्य शासनाने शहरातील १८ रस्त्यांसाठी १५ कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला होता. सन २०१३ मध्ये मिळालेल्या या निधीतून आता रस्त्यांचा विकास होत आहे. यांपैकी डांबरीकरणाची कामे जवळपास पूर्ण झाली असून, काँक्रिटीकरणाच्या कामास आयुक्त अजय लहाने रुजू होण्यापूर्वीच प्रारंभ होणार होता. परंतु, आयुक्त रुजू झाल्यानंतर त्यांनी सहा रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाची माहिती घेतली. रस्ते रुंद असताना प्रत्यक्षात रुंदीकरण करता रस्त्याचे काम केले जात असल्याची बाब त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेतला. याचबरोबर वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी रस्त्यांच्या मधोमध डिव्हायडर टाकण्याचा निर्णय घेतला.
आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाला महापालिकेतील सत्ताधारी तसेच विरोधी नगरसेवकांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे रस्त्यांचे काम थोड्या विलंबाने सुरू झाले असले, तरी आयुक्तांच्या या निर्णयामुळे रस्ते रुंद होणार आहे. काँक्रिटीकरणाच्या चार रस्त्यांच्या कामांना धडाक्यात प्रारंभ झाला आहे. एकीकडे रस्त्यांच्या कामांना प्रारंभ झाला असतानाच दूरदृष्टी ठेवणाऱ्या आयुक्तांनी आता रस्त्यांच्या डिव्हायडरमध्ये अत्याधुनिक स्वरूपाचे पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे. गांधी मार्ग तसेच अशोक वाटिका ते रेल्वेस्थानक मार्गादरम्यान, डिव्हायडरच्या मध्ये दुतर्फा लावलेल्या पद्धतीने हे पथ दिवे लावले जाणार आहेत.

७५ लाख रुपये खर्च
तीनरस्त्यांमध्ये अत्याधुनिक पद्धतीचे पथदिवे उभारण्यासाठी अंदाजे ७५ लाख रुपये खर्च करावे लागणार आहे. या निधीच्या जुगाडासाठी आयुक्त अजय लहाने प्रयत्नशील असून, लवकरच निधीची पूर्तताही केली जाणार आहे.

या तीन रस्त्यांवर लागतील पथदिवे
सिव्हिल लाइन ते मुख्य पोस्ट ऑफिस, रतनलाल प्लॉट चौक ते टॉवर चौक, दुर्गा चौक ते अग्रसेन चौक या मार्गांचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून, या मार्गावर डिव्हायडर बसवले जाणार आहेत. या रस्त्यांच्या डिव्हायडर मध्येच दुतर्फा उजेड देणारे अत्याधुनिक पथदिवे बसवले जाणार आहेत.