आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या उदरनिर्वाहासाठी घेतले अॅपेेचे स्टिअरिंग हाती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- जीवाभावाच्या पतीने अर्ध्यावर साथ सोडली. त्यामुळे संसार वेलीवरील चार फुले पोरकी झाली. क्षणार्धात आयुष्याचे चित्र पालटले. रक्ताच्या नात्यातील माणसे मदत करतील असे वाटले. मात्र, त्यांनीही परिस्थिती पाहून पाठ फिरवली. आता कोणापुढे हात पसरावा, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, खचून जाता मोठ्या हिमतीने संसाराचा गाडा हाकण्यासाठी एक स्त्रीशक्ती उभी राहिली. मुलाबाळांचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिने चक्क अॅपे चालवण्याचा निर्णय घेऊन परिस्थितीवर मात केली. त्यावेळी केलेल्या धाडसामुळे तिला आज त्याचे फळ मिळाले आहे. पंचफुला छगन सुरभे असे या स्त्रीशक्तीचे नाव आहे.

तालुक्यातील हतेडी येथील छगन सुरभे यांच्यासोबत पंचफुलाचे लग्न झाले होते. त्यांना चार मुलेही झाली. तीन मुली एक मुलगा असे त्यांचे कुटुंब होते. मात्र, अचानक छगन सुरभे यांचे आकस्मिक निधन झाले. घरी शेती नाही, माहेरची परिस्थिती बेताची, त्यामुळे मुलाबाळांचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला. या वेळी पंचफुला सुरभे यांनी नातेवाइकांकडे मदतीचा हात पसरवला. मात्र, त्यांना कोणीही मदत दिली नाही. दिवसेंदिवस त्यांना समाजाचा कटू अनुभव येत होता. मात्र, खचून जाता संकटावर मात करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. कर्ज काढून थ्री-व्हीलर अॅपे विकत घेतला. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या व्यवसायात महिलेला पाहून लोकांना आश्चर्य वाटत होते. सुरुवातीला पंचफुला सुरभे यांनाही अनेक अडचणी आल्या. चालक महिलेला पाहून त्यांच्या अॅपेत प्रवासी बसत नव्हते. मात्र, यावर मात करत त्यांनी अॅपे चालवण्याचा व्यवसाय सुरूच ठेवला.

आता या व्यवसायात त्यांना आठ वर्षे झाली असून, या माध्यमातून खर्च वगळता दिवसाकाठी त्यांना तीनशे ते चारशे रुपये मोबदला मिळत आहेत. या व्यवसायातून त्यांनी तिन्ही मुलींचे लग्न केले. मुलगा देशसेवेसाठी सैन्यात नोकरीस लागला आहे.
विरोध करणाऱ्या समाजानेच केला सत्कार
सुरुवातीला अॅपे चालवत असल्याच्या कारणामुळे नातेवाइकांसह समाजाने पंचफुला सुरभे यांना विरोध केला. मात्र, मुलाबाळांच्या उदरनिर्वाहासाठी या विराेधाला भीक घातली नाही. एकेकाळी विरोध करणारा समाज आज त्यांचा सत्कार करत आहे.


महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहावे
याजगात अनेक महिला समाजाच्या भितीपोटी दारिद्र्याचे जीवन जगत आहे. मात्र, त्यांनी हिंमत हारता आणि कोणत्याही कामाची लाज बाळगता प्रामणिकपणे कोणताही व्यवसाय करून स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन पंचफुला सुरभे यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केले.

जिल्ह्यातील पहिली महिला वाहन चालक
प्रवासीवाहन चालवण्याच्या व्यवसायात पुरूषांचे वर्चस्व होते. मात्र, त्याला मोडीत काढून पंचफुला सुरभे यांनी हा व्यवसाय स्वीकारला आहे. जिल्ह्यातील पहिली वाहनचालक म्हणून त्यांची ओळख झाली आहे. अॅपेद्वारे प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून त्यांचे कुटुंब आता स्थिर झाले आहे.