आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेटी बचाओ: 8 किलोमीटर अंतराच्या रांगेमध्ये 9 हजार विद्यार्थ्यांची मानवी श्रुंखला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियानात बुलडाणा जिल्ह्याचा समावेश असून त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहरात जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने मानव शृंखलेचे आयोजन करून बेटी बचाओ-बेटी पढाओचा हुंकार जागतिक महिला दिनी आज ८ मार्च रोजी देण्यात आला. ही मानव शृंखला सुमारे ८ किलोमीटर लांबीची होती. यात नऊ हजार शालेय विद्यार्थी, शिक्षक, नागरिक सहभागी झाले होते. 

शृंखलेचा मुख्य कार्यक्रम येथील गांधी भवन येथे आयोजित करण्यात आला. श्रुंखलेची सुरुवात सहकार विद्या मंदीर विद्यालयापासून करण्यात आली. येथे सिंदखेड राजा येथून आलेल्या जिजाऊ ज्योत यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी बुलडाणा अर्बनच्या कोमल झंवर मान्यवरांनी ज्योतीचे स्वागत केले. जि.प उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, सिं. राजा गट शिक्षणाधिकारी दिपक सवडतकर यांनी ही ज्योत सीईओ दिपा मुधोळ यांचेकडे सुपूर्द केली. त्यानंतर ज्योत आद्यलेखिका श्रीमती ताराबाई शिंदे यांच्या वाड्यात नेण्यात आली. शृंखलेचा समारोप मलकापूर रोडवरील डॉल्फिन जलतरण तलावाजवळ करण्यात आला. 

सामाजिक कार्यात महिलांनी झोकून द्यावे 
मुख्य कार्यकारी दिपा मुधोळ म्हणाल्या की, महिलांनी स्वत:ला कमी लेखता प्रत्येक क्षेत्रात आपल्या अस्तित्वाची छाप पाडावी. मुलींची गर्भात होणारी हत्या थांबवावी. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जाणीव जागृती करावी. तसेच स्त्रीने कौटुंबीक जबाबदारी पार पाडून सामाजिक कार्यात सुध्दा स्वत:ला झोकून द्यावे. तर इंदुमती लहाने यांनी स्त्री आज स्त्रीत्वाची भूमिका पार पाडून प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करताना दिसून येते. ही समाजाला अभिमानास्पद बाब असल्याची सांगितले. 

स्त्री जन्मदराचा कलंक पुसा 
गांधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी, कमी असलेला स्त्री जन्मदराचा जिल्ह्याला लागलेला कलंक पुसून टाकण्याचे आवाहन केले. दिपा मुधोळ यांनी मानव शृंखलेत अगदी कमी वेळात माहिती मिळून सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले. जि.प अध्यक्षा खंडारे यांनी जिल्ह्यात स्त्री जन्म दर वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न स्पृहणीय असल्याचे सांगितले. 

महिलांनी पुढे येऊन मतदारयादीत नाव नोंदवावे 
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांमध्ये मतदार जागृती करण्यात येत आहे. महिलांनी पुढे येवून मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी आज केले. उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रास्ताविकात मतदार जनजागृती तथा मतदार नोंदणी बदद्ल माहिती दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांच्याहस्ते मतदारांना मतदान ओळखपत्र वाटप करण्यात आले. उपआयुक्त जात पडताळणी समिती वृषाली शिंदे यांनी काही अनुभव यावेळी कथन केले. स्त्री मुक्ती संघटनेच्या समुपदेशक दिपाली राऊत तलाठी दुर्गा शेवाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. 
बातम्या आणखी आहेत...