आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाकचेरीवर मोर्चा काढून धरणे आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठातील पीएच.डी.चा राेहित वेमलू या दलित विद्यार्थ्याला झालेल्या अत्याचारामुळे प्राण गमवावे लागले. या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करून कुलगुरू विद्यापीठ प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी गुरुवार, २१ जानेवारी रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. यादरम्यान त्यांनी दिवसभर धरणे दिले. रोहित वेमलू आत्महत्या प्रकरणाचे पडसाद अकोला शहरातही उमटल्याचे आणि विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे यामुळे दिसून आले.
हैदराबाद येथील विद्यापीठात रोहित वेमलू इतर चार विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यापीठाने प्रवेश बंदी केली होती. वेमलू हे आंबेडकरी विचाराचे अनुयायी असल्यामुळे त्यांच्यावर विद्यापीठ प्रशासनाने बंदी घातली होती. दलित विद्यार्थ्यांना मिळणारी फेलोशिप बंद केली होती. वसतिगृहात प्रवेश नाकारला होता. याविरुद्ध आवाज उठवूनही सरकारने दखल घेतली नाही, असा आराेप शहरात काढलेल्या मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांनी केला.

हैदराबाद येथील प्रकरणाला विद्यापीठ प्रशासन, उपकुलगुरू, केंद्रीय मनुष्यबळ मंत्री स्मृती इराणी हे सर्वस्वी दोषी आहेत. त्यामुळे संबंधितांचे राजीनामे घेऊन सरकारने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी या वेळी विद्यार्थ्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायावर अशा प्रकारे अन्याय होत असल्याने दलित विद्यार्थ्यांवर आत्महत्येची वेळ आली असल्याचे नमूद करून देशात जातीय असहिष्णुता पसरवणाऱ्यांना त्वरित शिक्षा झाली पाहिजे, अशीही मागणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली.
मोर्चा आणि धरणे आंदोलनात पंकज खंडारे, श्रीकांत शिरसाठ, आकाश भगत, भूषण मेहसरे, प्रतुल विरघट, किरण शिरसाट, सुमंत तायडे यांनी सहभाग घेतला.

मंत्र्यांनी राजीनामे देण्याची मागणी
रोहित वेमलूच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्यांना तत्काळ अटक करून श्रममंत्री शिक्षणमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी रिपब्लिकन सेनेने केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवार, २१ जानेवारी रोजी याबाबत निवेदन देण्यात आलेे. या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधिताना अटक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तालुकाप्रमुख सुरेश मोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनाक्षी तायडे, युवक आघाडी अध्यक्ष संदेश गायकवाड आदींनी हे निवेदन दिले.