आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suffer From HIV Bride groom Introduction Rally In Akola

सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी; ऊर्जादायी स्तुत्य उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - धडधाकट आणि सदृढ उपवर युवक-युवतीचे परिचय मेळावे, जवळपास सर्वच समाजाच्या वतीने घेण्यात येतात. परंतु, समाजापासून विविध कारणांनी दूर केलेल्या दुर्लक्षित उपवर युवक-युवतींच्या विवाह समस्येकडे आज कोणत्याही संघटनेचे लक्ष गेलेले नाही. परंतु, सुदैवाने अकोल्यात असाच एक आगळावेगळा उपवर युवक -युवती (वधूवर) परिचय मेळावा १६ जानेवारीला पार पडला. या मेळाव्यामुळे दुर्लक्षित असलेल्या घटकांना एकत्रित करून सहजीवनाची एक नवी दिशा मिळाली.
‘दुरितांचे तिमीर जावो’ अशी मागणी ज्ञानदेवांनी निवृत्तिनाथांकडे पसायदानातून केली होती. पसायदानातून विश्व कल्याणाचीच मागणी केलेली आहे. त्यामुळेच पसायदानावर आजही पीएचडी केली जाते, तर दुसरीकडे संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्नही केला जातो. विविध समाजात मुलींची संख्या कमी झाल्याने विवाह ही एक समस्या बनली आहे. यासाठी वधूवर परिचय मेळावे घेतले जातात. तरीही समस्या मात्र कायमच आहे, तर एचआयव्हीग्रस्तांना त्यांचा कोणताही दोष नसताना समाजाबाहेर टाकले जाते. त्यामुळे असा मुलामुलींचा विवाह जुळून येणे दूरच.
परंतु, एचआयव्हीग्रस्तांची ही समस्या लक्षात घेऊन भय्यूजी महाराजप्रणीत सूर्योदय बालगृह संस्थेने १६ जानेवारीला एचआयव्हीसह जगणाऱ्या मुला-मुलींसाठी वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात राज्यभरातून ७० उपवर युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. या मेळाव्यामुळे दुर्लक्षित ठरलेल्या घटकांना आपल्या जीवनाचा साथी शोधण्याची संधी मिळाली. त्यामुळे हा मेळावा म्हणजे ‘सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी’ सारखा ठरला आहे. सूर्योदय बालगृहात झालेल्या या आगळ्यावेगळ्या मेळाव्याला उपमहापौर विनोद मापारी, विशाल जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक प्रतिभा देशमुख, गौतम ढाले यांनी केले. सूत्रसंचालन नितीन अहीर यांनी केले. भूषण खडसे यांनी आभार मानले. या वेळी दर्शन जनईकर, संगीता भाकरे, पंकज देशमुख, तुषार पाटील, शुभांगी खराटे, गोपाल चव्हाण, संध्या देशपांडे, संदीप फोकमारे, शिवराज पाटील, पूजा खारोळे, अंकिता घउटे, प्रियंका अहीर, अमोल सोनोने, बाबुलाल उमक, प्रशांत देशमुख, रूपेश दाबेराव, प्रा. कावरे मॅडम, नागोराव कंकाळ, गजानन शेजव आदी उपस्थित होते.