आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेची केंद्रीय चमूतर्फे पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - निमवाडी परिसरातील तहसीलदार यांच्या बंगल्यामागे होत असलेल्या सहा मजली सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठीच्या जागेची पाहणी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चमूने गुरुवारी दुपारी केली. अभियंत्यांच्या चमूने मातीचे नमुने घेतले असून, अहवालानंतर बांधकामास नवीन वर्षांत सुरुवात होत आहे.
रुग्णांना गुणवत्तापूर्ण आराेग्य सेवा मिळावी, या दृष्टीने सर्वोपचार रुग्णालयाव्यतिरिक्त स्वतंत्र १६० खाटांचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अकोल्यात होत आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्ह्यातील गरजू रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी, यासाठी केंद्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियंत्रणाखाली अत्याधुनिक वैद्यकीय उपचार सेवा सुविधा शस्त्रक्रियेची सुविधा असणारे स्वतंत्र सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अकोल्यात निमवाडी परिसरात मंजूर झाले आहे. केंद्रीय आरोग्य कुटुंबकल्याण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार, रुग्णालयाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होण्यापूर्वी माती परीक्षण करणे आवश्यक आहे, असे सांगण्यात आले होते. निधीच्या प्रशासकीय मान्यतेस मंजुरात मिळाली असल्याने बांधकाम विभागाकडून प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चमूने आज अकोल्यात होत असलेल्या सुपरस्पेशालिटीच्या जागेची पाहणी केली. बांधकामाचा कृती आराखडा तयार केला आहे.

या केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चमूत कार्यकारी अभियंता डॉ. जयंत शेकोकार, सहायक अभियंता व्ही. पी. वाराणसीकर अमरावती, अभियंता बऱ्हाटे, अकोला यांचा समावेश होता. या वेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. के. एस. घोरपडे, डॉ. आनंद आशिया, प्रशासकीय अधिकारी डॉ. संजीव देशमुख आदी उपस्थित होते.

मातीनमुन्यांच्या अहवालानंतर बांधकाम : अभियंत्यांच्याकेंद्रीय चमूने मातीचे नमुने घेतले आहेत. नागपूरच्या प्रयाेगशाळेत मातीचे परीक्षण करण्यात येणार असून, माती परीक्षणाच्या अहवालाअंती प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होईल.

आठवर्षांनंतर दुसरे रुग्णालय : २००७मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या िनयंत्रणात सर्वोपचार रुग्णालय झाले. त्यानंतर आठ वर्षांच्या कालखंडात अकोल्यात सुपरस्पेशालिटी रुग्णालय होणे ही गौरवाची बाब आहे. आरोग्य संस्थेच्या श्रेणीसंवर्धनांतर्गत या रुग्णालयाची निर्मिती होत आहे.

सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च
निमवाडीत होत असलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाची तरतूद मंजूर झाली असून, केंद्र सरकारचे १२० कोटी राज्य सरकारच्या ३० कोटी रुपयांचा सहभाग असणार आहे.