आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशन दुकानात अाता कागदांएेवजी अाता स्वाइप मशीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला -  सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या रेशन दुकानांमधील पूर्वापार कागदी व्यवहाराला शेवटची घरघर लागली असून ही पद्धत लवकरच संपुष्टात येणार अाहे. या व्यवहाराला पर्याय म्हणून जिल्ह्यातील सर्वच दुकानांमध्ये ‘स्वाईप मशीन’ बसविण्यात आल्या आहेत. ही यंत्रे रेशन कार्डधारकांच्या बोटांच्या ठशांवर चालणार आहेत. 
त्यामुळे रेशनचे धान्य देताना दुकानदारातर्फे ग्राहकाला द्यावी लागणारी पावती आणि धान्य साठ्याची उचल केल्यानंतर वेगवेगळ्या रजीस्टरमध्ये घ्यावी लागणारी त्याची नोंद अादी बरीचशी कागदी कामे बंद होणार आहेत. याऊलट ही सर्व माहिती स्वाईप मशीनमध्ये सदासर्वकाळ उपलब्ध राहणार असून सर्व्हरच्या आधारे ती थेट शासकीय अधिकाऱ्यांच्या संगणकाला जोडली जाणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेशी निगडीत अधिकाऱ्यांना आवश्यक असलेल्या नोंदी बसल्या ठिकाणांहूनच प्राप्त करता येणार आहे. 
महिला बचतगटांना नव्याने देण्यात आलेली काही दुकाने लक्षात घेता जिल्ह्यात एकूण १०६३ रेशन दुकाने आहेत. त्यापैकी आजघडीला १०५० दुकानांमध्ये स्वाईप मशीन बसविण्यात (इन्स्टॉल) आल्या असून उर्वरित १३ दुकानांमध्येही येत्या दोन-चार दिवसांत मशीन बसवल्या जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाचे म्हणणे आहे. कागदी व्यवहारामुळे ही प्रणाली बऱ्यापैकी पोखरली गेली होती. बनावट नावांची रेशनकार्डे, प्रत्यक्ष धान्य खरेदी केले नसतानाही संबंधित नावाने धान्याची उचल, गहू, तांदुळ आणि केरोसीनचा काळाबाजार अशा अनेक उणीवा परंपरागत पद्धतीमध्ये होत्या. त्याला आळा घालण्यासाठी स्वाईप मशीन आणण्यात आल्या असून त्यामधे प्रत्येक रेशनकार्डधारकाच्या कुटुंबातील बहुतेक सदस्यांच्या बोटांचे ठसे नोंदविण्यात आले आहे. अर्थात रेशन खरेदीला कुटुंबातील कोणताही एक सदस्य अाला, तरी बोटांचे ठसे स्वाईप करुन त्याला आपला व्यवहार पूर्णत्वास नेता येईल. 

जिल्ह्यात १३ मशीन्स नव्याने मागवल्या 
जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानांमध्ये स्वाईप मशीन्स बसवायच्या असल्याने तेरा मशीन्स नव्याने मागवण्यात आल्या आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने संबंधित कंपनीशी तसा पत्रव्यवहार केला असून त्या प्राप्त होताच शहरातील १२ आणि ग्रामीण भागातील एका दुकानात इन्स्टॉल केल्या जाणार आहेत. 

तीन वर्षांचा सेवोत्तर करार 
सदरमशीनमध्ये बिघाड अाल्यास तो तत्काळ दूर केला जावा किंवा मशीन बदलवून देण्यासाठी संबंधित कंपनीचे तंत्रज्ञ अकोल्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या माध्यमातूनच सर्व मशीन्स इन्स्टॉल केल्या जात आहेत. यासाठी त्यांच्यासोबत तीन वर्षांचा सेवोत्तर करार करण्यात आल्याची माहिती आहे. त्याउपरही बिघाड झाल्यास तंत्रंज्ञांकडून दुरुस्ती करुन दिली जाणार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...