आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Take Opportunity's Advantage And Become Successful

संधीचा लाभ घेऊन आपली प्रगती करा अन् यशस्वी व्हा : हातवळणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : मनपा शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना '२१ अपेक्षित'चे वाटप करण्यात आले.
अकोला - 'दिव्यमराठी'च्या लोकसहभागातून समस्यामुक्ती या महाअभियानाला शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे. त्यामुळे या अभियानामुळे मिळणाऱ्या संधीचा लाभ घेऊन आपली प्रगती गाठा आणि यशस्वी व्हा, असे आवाहन नगरसेवक प्रतुल हातवळणे यांनी केले.

महाअभियानांतर्गत २९ नोव्हेंबरला मायबोली कोचिंग क्लासेसमध्ये महापालिका मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांना २१ अपेक्षित प्रश्नसंच वाटप कार्यक्रमात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. नगरसेवक दिलीप देशमुख, मायबोलीच्या संचालिका सीमा बक्षी उपस्थित होत्या. प्रतुल हातवळणे म्हणाले की, आर्थिक दुर्बल घटकांमध्ये बुद्धिजीवी वर्ग आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना कोणत्याही सोयी-सुविधा मिळत नसल्याने ते पात्र असूनही गुणवत्ता गाठू शकत नाही. अशा विद्यार्थ्यांनाही विविध सोयी-सुविधा उपलब्ध झाल्यास हे विद्यार्थी प्रगतीचे शिखर गाठू शकतात. "दिव्य मराठी'च्या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनासह विविध सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. देणारे हात अनेक आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि विश्वास संपादन करणे महत्त्वाचे आहे. हा विश्वास या अभियानाने प्राप्त केला आहे. दहावीतील सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषयांचा प्रश्नसंच मिळाला आहे. या प्रश्नसंचाचा उपयोग प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावा. परीक्षा तोंडावर आली आहे. या संधीचा योग्य तो फायदा घेऊन प्रगती गाठा. आता यश मिळवले, तर पुढच्या शिक्षणासाठी निश्चितच समाजातून मदतीचे हात पुढे येतील. परंतु, त्यासाठी तुम्हाला अभ्यासरूपी कष्ट, मेहनत घेणे गरजेचे आहे, ही मेहनत घेतल्यास तुमच्या पदरात निश्चितपणे यश पडणारच, तर दिलीप देशमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त अभ्यास करण्याचे आवाहन करून शुभेच्छा दिल्या. या वेळी सीमा बक्षी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

बांधकाम विभागाने दिले संच : आपल्याशाळेतील विद्यार्थ्यांना इतर संस्था मदत करताहेत, मग आपण का नाही? या भावनेतून महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी दहावीतील विद्यार्थ्यांसाठी २१ अपेक्षित प्रश्नसंचाची खरेदी केली.