आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका जागेसाठी परीक्षार्थी होते ६०६, निकाल अवघ्या दोन-तीन दिवसांत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तलाठीपरीक्षेच्या मेगा इव्हेंटमध्ये आज, रविवारी ११ हजार ५११ बेरोजगार सहभागी झाले. अवघ्या १९ पदांसाठीच ही परीक्षा होती. त्यामुळे एका जागेसाठी ६०५.८४ इच्छुक एवढे प्रचंड प्रमाण नोंदले गेले. यावरुन समाजात किती बेरोजगार अजूनही शिल्लक आहेत, याचे भयावह चित्रही स्पष्ट झाले.
महसूल खात्यामार्फत शहरातील विविध ४९ केंद्रांवरुन ही परीक्षा घेण्यात आली. यामध्ये आरएलटी, एलआरटी, आरडीजी अशा नामांकीत महाविद्यालयांशिवाय बाभुळगाव येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचाही समावेश होता. सकाळी ११ ते दुपारी साडे बारा या वेळांत ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी १३ हजार ९३१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान हजार ४२० बेरोजगारांची गैरहजेरी नोंदवली गेली. त्यामुळे परीक्षार्थींची एकूण संख्या ११ हजार ५११ वर स्थिरावली आहे. या परीक्षेचा निकाल आगामी दोन-तीन दिवसांत घोषित केला जाईल, अशी तयारी संबंधित विभागाने केली आहे.

अकोला जिल्ह्यातील तलाठ्यांच्या १९ रिक्त जागा भरण्यासाठी महसूल खात्याने अलीकडेच आवाहन केले होते. त्यानुसार १३ हजार ९३१ बेरोजगारांनी अर्ज भरले होते. त्या सर्वांना आजच्या सामाईक परीक्षेला सामोरे जाण्याची संधी होती. परंतु विविध कारणांमुळे २४२० परीक्षार्थी या संधीला मुकल्याचे स्पष्ट झाले आहे. उमेदवारांच्या उपस्थितीची नोंद घेतल्यानंतर ही बाब उघड झाली आहे.

७०० कर्मचाऱ्यांनी केले संचालन :सदरपरीक्षेच्या संचालनासाठी महसूल, जिल्हा परिषद इतर शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमधिल सुमारे ७०० कर्मचाऱ्यांचे सहाय्य घेतले गेले. यापैकी बहुतेकांच्या खांद्यावर पर्यवेक्षक तर काहींच्या खांद्यावर केंद्राधिकाऱ्यांची जबाबदारी होती. परीक्षा विनासायास व्हावी म्हणून या सर्वांना दोन दिवसांआधीच विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनात नियोजन भवनात दोन टप्प्यात हे प्रशिक्षण घेतले होते.
बसस्थानक,रेल्वे स्टेशनवर गर्दी : परीक्षेच्यानिमित्ताने रविवारी शहरात सुमारे २० हजारांवर नव्या नागरिकांचे आगमन झाले होते, असा यंत्रणेचा अंदाज आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन, बसस्थानक, चहा-नाश्ताची दुकाने आदी सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. बाहेरगावच्या काही परीक्षार्थ्यांनी शनिवारी सायंकाळीच अकोल्यात ठाण मांडले असल्याने हॉटेल्स आणि लॉजवरही बऱ्यापैकी गर्दी नोंदली गेली. शनिवारी उशीरा रात्री पोहोचलेल्यांना तर खोल्या मिळणेही कठीण झाले, अशी संबंधितांची तक्रार आहे.

गैरप्रकार नाही, शांततेत झाली परीक्षा
^सदरपरीक्षेचे आयोजन अगदी शांततेत पार पडले. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडलेला नाही. परीक्षा आणि प्रश्नपत्रिकेसंदर्भातील काही आक्षेप असल्यास संबंधितांना सोमवारी सायंकाळपर्यंतची मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर निकाल घोषित करण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल.'' श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...