अकोला - पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीने शनिवारी दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्यात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपी शुक्रवारपासून दुचाकी चोरीच्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस ठाण्याच्या चार भितींच्या आत आरोपीने विष प्राशन केल्याने पोलिसांच्या ताब्यात आरोपी किती सुरक्षित आहेत. हे या निमित्ताने समोर आले आहे.
एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात रॉबीनसन बोर्ड, वय २७ रा. लहान उमरी चेतन प्रभाकर मनतकार वय २०, रा. गोरक्षण रोड या दोन आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून १० दुचाकी जप्त केल्या. त्यांना न्यायालयाने १७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. दोघांना सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवले होते. शनिवारी दुपारी वाजता या आरोपींना सिव्हिल लाइन्सच्या लॉकअपमधून एमआयडीसी पोलिसांनी रितसर बाहेर काढलेे.
दोघांनाहीएमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले. येथे पोलिसांनी त्यांची सखोल चौकशी सुरु केली. दरम्यान, आरोपी चेतन मनतकार याने आपल्याला लघुशंकेला जायचे असे सांगून तो एकटाच पोलिस ठाण्यातील स्वच्छतागृहात लघुशंकेला गेला. तेथील सज्जावर त्याला विषारी द्रव्य असलेली एक बॉटल दिसली. त्याने ती उघडली आणि विषारी द्रव्य प्राशन केले. बाहेर आल्यानंतर त्याच्या तोंडाला फेस आला त्याला ओकाऱ्या झाल्या. आरोपीने विषरी द्रव्य प्राशन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ आरोपीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.
यांच्यावर होती आरोपीची जबाबदारी
पोलिस कर्मचारी पंकज तायडे, रवी खंडारे सलीम पठाण या तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी या दोघांनाही सिव्हिल लाइन पोलिस लॉकअपमधून दुपारी वाजता दोन्ही आरोपींना बाहेर काढले होते. आरोपीची चौकशी ठाणेदार शिरीष खंडारे यांच्या मार्गदर्शनात हे पोलिस कर्मचारी करीत होते.
पोलिस ठाण्यातच शेती
पोलिस ठाण्यात आवारात पोलिसांनी शेती फुलवली आहे. शेतीत पेरलेल्या पिकांवर फवारण्यासाठी पोलिसांनी विषारी द्रव्य आणले होते. फवारणी झाल्यानंतर उरलेले विषारी द्रव्य त्यांनी स्वच्छतागृहात ठेवले असावे आणि तेच विषारी द्रव्य आरोपीने प्राशन केले असावे, अशी शक्यता वर्तवल्या जात आहे.
उपस्थित होणारे प्रश्न
आरोपी पोलिस कोठडीत असताना आरोपीची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची असते. अशावेळी आरोपीला एकटे कसे सोडण्यात आले. पोलिस ठाण्यात विषारी द्रव्य कोठून आले. आरोपीची चौकशी सुरु असताना पोलिसांनी खबरदारी कशी घेतली नाही. पोलिस कोठडी दरम्यान त्याला एवढी थर्ड डीग्री दिली का की त्यानेआत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलावे. असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांची रुग्णालयात धाव
कोठडीतील आरोपीने विष प्राशन करणे ही गंभीर बाब अाहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालयात धाव घेतली. अप्पर पोलिस अधिक्षक विजयकांत सागर यांच्यासह सर्व पोलिस ठाण्याचे ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख या वेळी उपस्थित होते.