आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणुकीत भाजप-सेना युतीची जोरदार शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना’, अशी अवस्था असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची महापालिका निवडणुकीत युती होण्याची जोरदार शक्यता व्यक्त केली जात आहे. २०१२ च्या निवडणुकीत ताणली गेलेली आणि शेवटच्या क्षणाला जाहिर झालेली युती, या निवडणुकीतही शिवसेनेला जागा देण्यावरुन ताणली जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने प्रभाग रचनेचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कोणत्या नगरसेवकाचा विद्यमान भाग कोणत्या भागाला जोडला जाणार? याबाबत सर्वच पक्षाचे नगरसेवक तसेच इच्छुकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत युती, आघाडी होणार की नाही? याबाबतही चारही पक्षाचे कार्यकर्ते तर्कवितर्क लढवित आहेत. आघाडीत राष्ट्रवादी कॉग्रेसची बाजू २०१२ च्या महापालिका निवडणुकी पेक्षा यावेळी भक्कम आहे. त्याच बरोबर केंद्रात, राज्यात आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करता अधिक जागा जिंकल्याने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. महापालिका निवडणुकीत यावेळीही सत्तेवर येता याव, या हेतूनेच राज्य शासनाने एका प्रभागातून चार नगरसेवक निवडण्याचा निर्णय घेतला आहे. जेणे करुन जास्तीत जास्त नगरसेवक निवडुन यावेत. त्यामुळेच महापालिका निवडणुकीत भाजप-सेनेची युती होईल की नाही? अशी चर्चा दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्येतसेच कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहेत.
२०१२ च्या निवडणुकीत युती होऊनही ७३ जागांवर युतीने उमेदवार दिले नव्हते. भाजपने ३३ जागा लढवल्या तर शिवसेनेने २८ जागांवर उमेदवार दिले होते. भाजपचे ३३ पैकी १८ तर शिवसेनेचे २८ पैकी आठ नगरसेवक निवडुन आले. तसेच भाजपचे १२ उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले. मागच्या निवडणुकीत मुस्लिम बहुल भागात उमेदवार देण्याचा प्रयत्न भाजपने केला. परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. मात्र या निवडणुकीत एका प्रभागातून चार नगरसेवक निवडुन द्यावे लागणार असल्याने भाजप अनुसुचित जाती आणि मुस्लिम बहुल प्रभागातही उमेदवार देणार असल्याची माहिती भाजप सुत्रांनी दिली. त्यामुळेच ८० पैकी किमान ५० जागांवर भाजप दावा करण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शिवसेनेसोबत जागा वाटप करताना युती ताणली जाण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये दोन मतप्रवाह
भारतीयजनता पक्षात महापालिका निवडणुकीत युती करावी की नाही? याबाबत दोन मतप्रवाह आहे. एका मतप्रवाहानुसार शिवसेनेसोबत युती करता स्वबळावर निवडणुक लढवावी तर दुसऱ्या मतप्रवाहानुसार सत्तेत यायचे असेल तर शिवसेनेसोबत युती करणे गरजेचे आहे.

निर्णय स्थानिक पातळीवर
महापालिका निवडणुक स्वबळावर की युती करुन? याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अद्याप निर्णय झालेला नाही. तरी विश्वसनिय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका निवडणुकीत युती करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याची मुभा पक्षातर्फे दिली जाऊ शकते. त्यामुळेच भाजप-सेनेची युती होण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

बंडखोरांच्या जागा भाजपकडेच
भाजपचे १८ नगरसेवक निवडुन आले होते. तसेच पाच बंडखोर निवडुन आले. हे सर्व बंडखोर पुन्हा भाजपमध्ये परले आहेत. त्याच बरोबर काही अपक्षही भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे विद्यमान २५ नगरसेवकांच्या जागा तसेच दुसऱ्या क्रमांकावरील १० ते १२ जागा आणि अनु. जाती आणि मुस्लिम बहुल भागात उमेदवार देण्याच्या निर्णयामुळेच भाजप अधिक जागांवर दावा करण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...