अकोला- गोरक्षणरोडवरील सहकार नगरमध्ये वर्षभरापूर्वी एका घरातून लाख ५३ हजार रुपयांसह लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणाचा सुगावा चोरट्यांनी चोरून नेलेल्या मोबाईल लोकेशनवरून लागला. या प्रकरणी पोलिसांनी नांदुऱ्याहून रविवारी रात्री एका संशयितास अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
१४ जून २०१६ च्या रात्री सहकारनगरमध्ये शरद केशवराव कोकाटे यांच्या घरात चोरी झाली होती. चोरट्यांनी कुलरच्या पाण्यामध्ये गुंगीचे औषध टाकून चोरी केली असावी असे प्रथमदर्शनी तपासात दिसून आले होते. या वेळी चोरट्यांनी एकूण लाख ६५ हजार रुपयांचा माल चोरून नेला होता. खदान पोलिसांनी शोध सुरू केला असता त्यांना नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा येथील मीरखॉ हयातखॉ हा संशयित आरोपी असल्याचे समजले. आरोपीचे पहिले लोकेशन बुलडाणा आले. त्यानुसार पोलिस बुलडाणा येथे गेले असता त्याचे लोकेशन मोताळा आणि त्यानंतर मलकापूर येत होते. त्यानंतर पोलिसांनी नांदुरा येथून आरोपीला अटक केले. ही कारवाई ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात शशिकांत नावकार,गणेश उज्जैनकर, किशोर सोनोने, सागर भारस्कर, रघुनाथ नेमाडे यांनी केली.
चोरीच्या मोबाइलचे लोकेशन वर्षभरानंतर : चोरट्यांनीघरातून मोबाइल चोरून नेला होता. पोलिसांनी हा मोबाइल ट्रेसिंगवर टाकला होता. वर्षभरानंतर या मोबाइलचे लोकेशन बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथील आले. पोलिसांनी धाड येथे जावून मोबाइल वापरणाऱ्याचा शोध घेतला. मोबाइल वापरणारा हा मोबाइल दुरुस्तीचे काम करतो. त्याच्याकडे मीरखाॅ हयातखॉ याने तो दुरुस्तीला टाकला होता. मात्र पुन्हा त्याने तो नेलाच नसल्याने मोबाइल दुरुस्ती करणाऱ्याने तो वापरणे सुरु केला. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे मोबाइल दुरुस्तीला टाकणाऱ्याचा दुसरा नंबर होता. त्यावरून पोलिस नांदुऱ्यात पोहचले.