आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानगंगा अभयारण्यातील प्राणी वाहनांमुळे धोक्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - शहरापासून१६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोथा जंगलाच्या ज्ञानगंगा अभयारण्यातील प्राणी असुरक्षित असल्याची बाब प्राकर्षाने पुढे येत आहे. आतापर्यंत अस्वल, कोल्हे, बिबटे आदी प्राण्यांचा वाहनांच्या धडकेने मृत्यू झाला आहे. दोन वर्षांच्या काळात तब्बल आठ बिबटे अपघातात मृत्यूमुखी पडले आहेत.

प्राण्यांना अभय देवून त्यांची संख्या वाढावी वन्यप्राणी सुरक्षित राहावेत, यासाठी बुलडाणा शहरापासून १६ किलोमीटर अंतरावर ज्ञानगंगा अभयारण्याची निर्मिती करण्यात आली. मात्र, यामध्ये वन्यप्राणी सुरक्षित नसल्याचे अपघाताच्या घटनांवरून दिसून येत आहे. मांसाची वाहतूक करणारे ट्रक या भागातून जातात. त्या वासाने वन्यप्राणी रस्त्याकडे आकर्षित होतात अशी शक्यता वाटत असल्याने या भागातून होणारी मांसाची ट्रक वाहतूक रोखण्यात आली. मात्र, वन्यप्राण्याचे अपघात थांबले नाहीत. २०१४ मध्ये ट्रक अपघातात चिरडून एका मादी बिबटाचा मृत्यू झाला होता. २०१५ मध्ये एक ऑगस्ट रोजी हनवतखेड येथे एका बिबटाचा मृतदेह आढळला. दोन्ही बिबटे गर्भार होते, त्यांच्या पोटात पाच पिल्ले होती.

वन्यप्राणी संरक्षणासोबतच वृक्षतोड रोखण्यासही वन विभागाला येथे अपयश आल्याचे दिसत आहे. अभयारण्यालगत असणाऱ्या गावांमधील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते. जंगलात पाण्याचा पुरेसा साठा नाही. त्यामुळे भक्ष्य पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे जातात. बुलडाणा-खामगाव हा मार्ग अभयारण्यातून गेल्यामुळे रात्रीच्या वेळी अनेक प्राणी रस्त्यावर येतात. त्यामुळे प्राण्यांचे अपघात होतात. त्यामुळे प्रभावी उपाययोजनांची अपेक्षा वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

वनक्षेत्रात अनेकदा जाणवते पाण्याचे दुर्भिक्ष
उन्हाळ्याच्यादिवसांत अभयारण्याच्या क्षेत्रात पाणीसमस्या जाणवते. सध्याही दुष्काळसदृश स्थिती आहे. अधूनमधून रिमझिम पाऊस होतो. मात्र, नदी-नाल्यांना पाणी येईल असा पाऊस झाला नाही. त्यामुळे जंगलात पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. वन्यप्राण्यांना पिण्यासाठी जंगलामध्ये पाण्याचा मोठा साठा नाही त्यामुळे तहान भागवण्यासाठी वन्यप्राणी जंगलाबाहेर पडतात. प्राण्यांनी जंगल सोडू नये किंवा पाण्याअभावी वन्यप्राण्यांचा मृत्यू होऊ नये यासाठी पाणवठे निर्माण करणे त्यात कायमस्वरुपी पाण्याची व्यवस्था करण्याची अपेक्षा वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

अवैध वृक्षतोडीवरही नियंत्रणाची अपेक्षा
ज्ञानगंगाअभयारण्यालगत आठ ते दहा गावे आहेत. याशिवाय तीन वनग्रामही आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होते. त्यामुळे जंगलातील सागवन, शिवन, अंजन, बाभूळ आदी महत्वपूर्ण वृक्षांची जंगलतोड होत असल्याने जंगलाचे रुप बदलत चालले आहे. वन विभागाने अवैध वृक्षतोडीवर कठोर उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
बातम्या आणखी आहेत...