आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिघांकडून युवकावर प्राणघातक हल्ला, रेल्वेस्थानक चौकात पूर्ववैमनस्यातून घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पूर्व वैमनस्यातूनअकोटफैल येथील एका २६ वर्षीय युवकावर अज्ञात तिघांनी चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना रेल्वेस्थानक चौकातील भारत हॉटेलच्या समोर मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमीला सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वेस्थानकावर रात्री ८.३० वाजतादरम्यान अकोटफैल परिसरातील रहिवासी शे. जमीर उर्फ बाबू गणी हा त्याच्या मित्रांसोबत भारत हॉटेलच्या समोर बोलत उभा होता. या वेळी अचानक त्यांच्याजवळ तिघे जण आले आणि त्यांनी त्याच्यावर चाकूने वार केले. त्यामुळे गंभीर जखमी झालेला शे. जमीर हा रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर हल्लेखाेर घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेची माहिती रामदासपेठ पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक सुभाष माकोडे आणि त्यांचा ताफा तत्काळ घटनास्थळावर पोहोचला. त्यांनी शे. जमीर याला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण यांना मिळताच त्यांनीही घटनास्थळावर धाव घेतली आणि आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. ही घटना पूर्ववैमनस्यातून आणि वरचढपणातून घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गंभीर जखमी झालेला शे. जमीर आणि त्याच्या मित्रांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे, तर रामदासपेठ पोलिसांनी आरोपींच्या तपासासाठी पथक गठित केले आहे.