आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामधील ५४ गावे करण्यात येणार हागणदारीमुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गतवर्षी जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत शौचालय बांधकामांचे कार्य निराशाजनक राहिले. त्यावर या वर्षी ४९ हजार शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंग यांनी उद्दिष्टपूर्ती करण्याच्या स्पष्ट सूचना केल्या आहेत. तसेच अभियानांतर्गत जिल्ह्यातील ५४ गावे ३१ जुलैपूर्वी हागणदारीमुक्त करण्याचा निर्धारही करण्यात आला आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत असलेल्या वेबसाइटवर अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात १५ जुलैपर्यंत हजार ९०१ व्यक्तिगत शौचालय बांधकामे करण्यात आली असून, जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे, तर दुसरीकडे युनायटेड नेशनच्या आयुक्त राज समितीच्या अहवालानुसार जिल्ह्यात उघड्यावर शौच विधी करण्यात येत असलेली ५४ गावे असल्याचे नमूद आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षाच्या अंतर्गत शौचालय बांधकाम आणि इतर पाणी स्वच्छतेची कामे केली जातात. गत वर्षी शौचालय बांधकामांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने सीईओंनी कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दात इशाराही दिला होता. कामे पूर्ण होत नसल्यास कंत्राट समाप्तीनंतर पुनर्नियुक्ती दिली जाणार नसल्याचे त्यांनी खडसावून सांगितले आहे. शौचालय बांधकामांच्या बाबतीत जिल्ह्याची असमाधानकारक कामगिरी पाहता या वर्षी समाधानकारक कामगिरी करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंदर सिंग यांनी गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, तहसीलचे आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी आणि जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षाचे विशेषज्ञ, सल्लागार, गट समूह समन्वयक यांची बैठक घेतली. ३१ जुलैपूर्वी जिल्ह्यातील उघड्यावर शौच विधी होत असलेली ५४ गावे हागणदारीमुक्त करण्याचे निर्देश त्यांनी या वेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

हागणदारीमुक्तीसाठी दृष्टिक्षेपातील गावे
जिल्ह्यातील५४ गावे हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. त्यामध्ये अकोला तालुक्यातील १३, अकोट ३, मूर्तिजापूर ९, बाळापूर १२, पातूर ३, बार्शिटाकळी आणि तेल्हारा तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...