आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६५ गावे हागणदारीमुक्त प्रशासनाची जनजागृती; निर्मल ग्रामकडे वाटचाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नागरिकांनी आपले गाव स्वच्छ करण्याचा विडा उचलल्याने जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतीअंतर्गत जवळपास ६५ गावे चालू वर्षात १०० टक्के हागणदारीमुक्त झाली आहेत. मार्चअखेरपर्यंत आणखी ३५ ग्रामपंचायती प्रगतिपथावर असून, त्या गावांमध्ये वैयक्तिक शौचालयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक गाव स्वच्छ सुंदर व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी लोकसहभाग वाढवण्यासाठी नागरिकांना प्रेरित केले. पाणी स्वच्छता मिशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध कौशल्याच्या आधारे नागरिकांना प्रोत्साहित केले. त्यामुळे आज जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतींची लोकसहभागातून "निर्मल ग्राम'च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. गावांना स्वच्छ करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. शौचालय बांधकामासाठी नागरिकांना वेळेवर निधी उपलब्ध करून देण्यात आला. यासोबतच प्रबोधनावर भर दिला गेला. तसेच पाणी स्वच्छता मिशनच्या आयईसी उपक्रमांतर्गत गावांमध्ये जाऊन शौचालयांचे महत्त्व पटवून दिले जात आहे. आठ महिन्यांपासून केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे फलित दिसू लागले आहे. काही ठिकाणी ग्रामस्थांच्या आवाहनास अधिकाऱ्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत गावाची पाहणी करून अत्यावश्यक सुविधांची यादी तयार केली. ग्रामपंचायतस्तरावर सरपंच, उपसरपंच सदस्यांनी सहकार्य केल्याने या गावांमध्ये शौचालयांची बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे दिसून येते.

सार्वजनिक शौचालये बांधावीत
^वैयक्तिक शौचालया सोबतच आपले गाव स्वच्छ व्हावे ही भावना प्रत्येकात रुजायला हवी. तसे झाल्यास प्रत्येक गाव स्वच्छ सुंदर होऊ शकेल. शौचालये बांधल्यास त्याचा लाभ घेता येऊ शकतो.'' समर्थ शेवाळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, (पाणी स्वच्छता)

नरेगांतर्गत शौचालये
गावातील ज्या नागरिकांकडे शौचालय नाही अशांना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शौचालये बांधून दिली जात आहेत. सोबतच घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामस्वच्छता, पर्यावरणपूरक बाबींवरही भर दिला जात आहे.
बातम्या आणखी आहेत...