आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तलाठी परीक्षेचा उद्या मेगा इव्हेंट; १४ हजारांवर परीक्षार्थी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महसूल विभागामार्फत घेतल्या जाणाऱ्या तलाठी परीक्षेचा मेगा इव्हेंट रविवार, ११ सप्टेंबरला शहरात दिसून येणार आहे. अकोला शहरातील विविध ४९ केंद्रांवरून तब्बल १४ हजार १२ उमेदवार या पदासाठी परीक्षा देणार आहेत.
अकोला - जिल्ह्यातील तलाठ्यांच्या भरतीसाठी महसूल विभागाद्वारे ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसार १४ हजार १२ उमेदवारांनी अर्ज भरले असून, या सर्वांना रविवारी सामाईक परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. शहरातील ४९ शाळा-महाविद्यालयांत ही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी महसूल, जिल्हा परिषद इतर शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांचे सहाय्य घेतले जाणार आहे.

महसूल विभागाने तयार केलेल्या वेळापत्रकानुसार रविवारी सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळात ही परीक्षा घेतली जाईल. दरम्यान ही परीक्षा सुरळीत पार पडावी आणि परीक्षेदरम्यान कोणताही गोंधळ उडू नये म्हणून पर्यवेक्षक, केंद्राधिकाऱ्यांची एक सभा शुक्रवार, सप्टेंबर रोजी दुपारी नियोजन भवनात घेण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आलेल्या या सभेला विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.
या सर्वांना केंद्राधिकारी, पर्यवेक्षक, राखीव अधिकारी अशा विविध पदांवर नियुक्त करण्यात आले आहे. परीक्षार्थ्यांचे आगमन किती वाजता होणार, त्यांना प्रश्नपत्रिका किती वाजता द्यायची, उत्तरपत्रिकांचे वितरण करताना काय काळजी घ्यायची, उत्तरे लिहिण्याची पद्धत कशी आहे, परीक्षार्थींची मोजदाद कशी करायची, त्यांचा प्रवेश किती उशिरापर्यंत होऊ द्यावा आदी सर्व मुद्दे या दरम्यान समजावून सांगण्यात आले.

दळणवळण अन्य व्यवस्थेत बदल जाणवणार : सुमारे२५ हजारांपेक्षा अधिक नवे नागरिक शहरात दाखल होणार असल्याने दळणवळणासह शहरातील इतर व्यवस्थांवरील बदल जाणवणार असून, काहिसा ताणही वाढणार आहे. शहरात बाहेरगावांवरून येणारे बहुतांश परीक्षार्थी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आधार घेणार असल्याने एसटी, रेल्वे आणि तत्सम सेवांवर काहिसा परिणाम होणार आहे. शिवाय भोजन आदी व्यवस्थांवरही काही प्रमाणात ताण येणार असल्याचा अंदाज आहे.
एकाच दिवशी शहरात दाखल होणार २५ हजार नवे नागरिक
तलाठ्यांच्या परीक्षेला १४ हजार १२ उमेदवारांनी नोंदणी केली असल्याने रविवार शहरात किमान २५ हजार नवे नागरिक दाखल होणार आहेत. परीक्षार्थ्यांमध्ये महिला उमेदवारांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. किमान एका परीक्षार्थ्यासोबत एक नातेवाईक जरी शहरात आला तरी नव्या नागरिकांची संख्या २८ हजारांवर जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...