आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा: नदी-नाल्यांना पूर; अनेक मार्गांवर वाहतूक झाली ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - मागील चार दिवसांपासून जिल्ह्याच्या काही भागात दमदार, तर काही भागात तुरळक स्वरूपात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, गुरुवारी रात्री १५ सप्टेंबर रोजी सकाळपासून ते दुपारपर्यंत जिल्ह्याच्या सर्वच भागात विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस पडला. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला आहे. या पुराचे पाणी नाल्याच्या पुलावरून वाहत असल्याने अनेक मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तर नाल्यातील पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नदी, नाल्याच्या पुरामुळे जिल्ह्यात मोठ्या, मध्यम लघु प्रकल्पात वाढ झाली. जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

 यंदा जुन महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर मात्र जुलै ऑगस्ट या महिन्यात १५ ते २० दिवसांची पावसाने दडी मारली होती. अनियमित पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीनसह इतर पिकांना बसला. त्यातच पावसाळ्याचे तीन महिने संपले तरी, जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नव्हता. या तीन महिन्यांत जो काही पाऊस पडला तो फक्त पिकासाठी पोषक ठरला होता. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्प अद्यापही तहानलेले होते. परंतु उशिरा का होईना चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. परंतु हा पाऊस काही भागात दमदार, तर काही भागात तुरळक पडत होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली होती. दरम्यान, गुरुवारी रात्री वाजता जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात झाली. आज विजेच्या कडकडाटासह तब्बल चार ते पाच तास पाऊस पडला. 

यामुळे जिल्ह्यातील नदी, नाले दुथडी भरून वाहिले. काही नदी, नाल्यांच्या पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर नाल्याच्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान आज शहरातील रहिवासी सखाराम दौलतराव नागपुरे वय ६५ यांच्या घरावर वीज पडल्यामुळे ७६ हजार रुपयांचे नुकसान झाले. परंतु सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. तर शहराच्या बाजूलाच असलेल्या पैनगंगा नदीच्या पुरात दोन गाय, एक घोडा काही मोकाट जनावरे वाहून गेल्याची माहिती मिळाली. या पावसाने सखल भागात पाणी साचले, तर झोपडपट्टीतील अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. 
 
प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ 
गुरुवारी आणि आज झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी, नाले दुथडी भरून वाहिले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तहानलेल्या मोठ्या, मध्यम लघु प्रकल्पात बऱ्यापैकी जलसाठा निर्माण झाला आहे. 
 
वीज पुरवठा खंडीत 
आज सकाळपासूनच विजेच्या कडकडाटासह पावसाने धो धो बरसण्यास सुरुवात केली. या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीज पुरवठा तीन ते चार तास खंडीत झाला होता. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. 
 
जिल्ह्यात मागील २४ तासांत झालेला पाऊस 
मागील २४ तासांत जिल्ह्यात २१३ मिमी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस बुलडाणा तालुक्यात ५३ मिमी. झाला. त्या खालोखाल चिखली ०२, देऊळगावराजा १४, सिंदखेडराजा १, लोणार ८, मेहकर ४४, शेगाव ४१, मलकापूर २०, नांदुरा ६, मोताळा १४, संग्रामपूर तालुक्यात १० मिमी. पाऊस झाला. खामगाव जळगाव जामोद तालुका निरंक आहे. 
बातम्या आणखी आहेत...