आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माकडावर उपचार सुरू, तर जखमी पोपटाचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- समाजात वन्यजीवांविषयी बऱ्यापैकी जनजागृती झाली असून, अलीकडे जखमी प्राणी, पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी अनेक पुढाकार घेताना दिसून येतात. अशाच पुढाकारातून आज, १६ जुलैला शहरात एक पोपट अन् माकडाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न निसर्गप्रेमींनी केला. यामध्ये माकडावर उपचार सुरू असून, पोपटाचा मात्र मृत्यू झाल्याची घटना घडली.
शहरातील मित्र समाज क्लबनजीक गत दोन दिवसांपासून झाडावरील मांज्यात एक रोझरिंग पॅराकिट म्हणजेच पोपट अडकल्याचे नागरिकांनी पाहिले. त्याला दोन दिवसांपासून इतर पोपट मांजात फसलेल्या अवस्थेत अन्न भरवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान, आज त्याविषयी महापालिका उपायुक्त माधुरी मडावी यांना माहिती मिळताच त्यांनी निसर्ग अभ्यासक उदय वझे, देवेंद्र तेलकर यांना माहिती देऊन घटनास्थळी अग्निशमन दलासह ताफा पाठवला. उंच झाडावर मांजात अडकलेल्या पोपटाला महत् प्रयासाने त्यांनी सोडवले.
मात्र, सोडवताना त्याच्या गळ्याला इजा झाली. त्याला सोडवण्यासाठी मनपा अग्निशमन विभागातील फायरमन विनोद इंगळे, महम्मद रिजवान, विजय राऊत, स्वराज बल्लाळ, चालक गाडगे यांनी पुढाकार घेतला. त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, तासभराने त्याने प्राण सोडले,
तर दुसऱ्या घटनेत वाडेगावनजीक नकाशी येथे एका शेतात माकड पडले असल्याची माहिती गावकऱ्यांनी वनरक्षक के. एम. ताकझुरे यांना कळवली. त्यांनी घटनास्थळी जाऊन त्या माकडाला अकोला वन विभागात आणले. सदर माकडाला इलेक्ट्रिक शॉक वा इतर कुठल्या तरी कारणाने पॅराॅलिसिस झाल्याचे लक्षात आले. त्याचा एक पाय एक हात निकामी झाला आहे, तरी त्याचेवर उपचार करण्यासाठी त्याला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडे नेण्यात आले. डॉ. मिलिंद थोरात यांनी त्याचेवर उपचार केले असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक वायाळ यांच्या मार्गदर्शनात त्याला वन विभागातील पिंजऱ्यात ठेवण्यात आले असून, त्याचेवर उपचार सुरू राहणार आहे. या कामासाठी सर्पमित्र शेख महम्मद उर्फ मुन्ना, वनरक्षक एम. पी. सोनोने यांनी पुढाकार घेतला.
बातम्या आणखी आहेत...