आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचाराअभावी महिलेचा मृत्यू, आमदार सावरकरांकडून प्रशासनाची कानउघाडणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वेळेवर उपचार मिळाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात १४ जुलै रोजी पहाटे महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होण्याची ही महिन्यातील चौथी घटना आहे.
शहरातील पार्वतीनगरातील रहिवासी किरण क्षीरसागर यांची पत्नी अर्चना यांना गुरुवारी पहाटे ५.१५ वाजता स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. उपस्थित डॉक्टरांनी थातूरमातूर तपासणी केली. दिवस उजाडला की ईसीजी करण्याचा सल्ला दिला. पाच ते दहा मिनिटांतच महिलेचा त्रास वाढला. ताबडतोब अतिदक्षता विभागात भरती होण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, अतिदक्षता विभागात बेड खाली नसल्याने तिला वाॅर्ड नंबर मध्ये भरती करण्यात आले. त्रास वाढल्याने छातीत वेदना होऊ लागल्या. वाॅर्डातील परिचारिका मात्र बघ्याची भूमिका घेत होत्या. असे होतच असते काळजी करू नका, असे म्हणून त्यांनी वेळ मारली. मात्र, काही मिनिटांतच महिलेने प्राण सोडले. हा सर्व प्रकार नातेवाइकांसमोर झाला.

या प्रकाराची माहिती आमदार रणधीर सावरकर यांना मिळताच त्यांनी रुग्णालयात भेट दिली. या वेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. बनसोड यांना जाब विचारला. तेव्हा ड्युटीवरील डॉक्टरांनी आम्ही उपचारात दिरंगाई केल्याची चूक मान्य केली. वैद्यकीय यंत्रणेच्या चुकीमुळे एका महिलेला जीव गमवावा लागला.

आमदारांची धाव : सर्वोपचाररुग्णालयातील प्रकाराची माहिती मिळताच आमदार रणधीर सावरकर यांनी रुग्णालयास भेट देऊन प्रशासनाची कानउघाडणी केली. आमदारांसमोरच डॉक्टरांनी चूक कबूल केली.

बेड्स वाढवण्यात यावे : अतिदक्षताविभागातील बेडची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ १५ बेड्स आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने व्हेंटिलेटरसह आयसीयूमधील बेड संख्या वाढवावी. ज्यामुळे रुग्णांचे बळी जाणार नाहीत.
प्रशासनावर होईल का कारवाई?
या महिलेच्या म़ृत्यूस जबाबदार असणाऱ्यांनी चूक कबूल केली असतानाही सायंकाळपर्यंत संबंधितांना साधी नोटीससुद्धा वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने बजावली नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रुग्ण कल्याण समिती नावालाच?
दोन दिवसांपूर्वीच बस मिनीट्रकला अपघात झाल्यानंतर रुग्णालयात अशाच प्रकारे दिरंगाई झाल्याचा प्रकार घडला. त्यानंतर आज ही घटना. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांतर्गत कार्यरत असलेली रुग्ण कल्याण समिती करतेय तरी काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...