आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगोपनाकडे दुर्लक्ष झाल्याने हजारो रोपट्यांची झाली माती, सुमारे ९० किलोमीटर क्षेत्रावर ७१ हजार ५१० जिवंत रोपे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - काही याेजना छायाचित्र काढण्यापुरत्याच राबवल्या जातात. त्यातलीच सामाजिक वनीकरण विभागाची ‘झाडे लावा-झाडे जगवा’ ही माेहीम. कागदाेपत्री जिल्ह्यात नऊ महिन्यांत ७१ हजार रोपे लावण्यात आल्याचा अहवाल सामाजिक वनीकरण विभागाकडे आहे. मात्र, या ७१ हजार वृक्षांपैकी किती जगले हा संशाेधनाचा विषय अाहे. वृक्ष लागवडीचा अाव अाणून त्याचे संगाेपन करणाऱ्यांविरुद्ध सामाजिक वनीकरण विभागाने शहानिशा करून कारवाई प्रस्तावित करणे गरजेचे आहे.
सामाजिक वनीकरण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्ट २०१५ रोजी एकाच दिवशी जिल्ह्यातील ५९४ शाळांमार्फत प्रती शाळा १५ रोपे असे एकूण ११ हजार ८८० रोपे लावण्यात आली. याच अनुषंगाने अकोला शहरात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले कन्या शाळेत वृक्षारोपणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. याशिवाय जिल्ह्यातील अकोला, बार्शिटाकळी, बाळापूर, मूर्तिजापूर, अकोट, तेल्हारा तालुक्यात ९० किलोमीटर क्षेत्रावर ७१ हजार ५१० रोपे लावल्याचा अहवाल सामाजिक वनीकरण विभागाला पाठवण्यात आला आहे.
वृक्ष लागवडीसाठी रोजगार हमी योजनेंतर्गतसुद्धा शासनातर्फे आग्रही भूमिका घेतली जाऊन रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावली पाहिजेत, असे निर्देश आहेत. सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवडीसाठी पंचायत विभाग, शिक्षण विभागासह इतर यंत्रणेला प्रोत्साहित केले जाते. सामाजिक वनीकरण विभागातर्फे दरवर्षी १५ ऑगस्ट ते २६ जानेवारीदरम्यान वृक्ष लागवडीचे आवाहन केले जाते. या मोहिमेत शिक्षक, ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरते. गावातील झाडांची निगा राखण्याचे काम ग्रामसेवकांवर सोपवले जाते. मात्र, केवळ उद‌घाटनापुरते वृक्षारोपण होत असल्याने आज झाडांची संख्या कमी झालेली दिसून येते. वृक्ष लावा-वृक्ष जगवा हे अभियान जर प्रभावी राबवल्या गेले असते, तर रस्त्याच्या दुतर्फा गाव परिसरात झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली असती. शासनाच्या आदेशानुसार विविध ठिकाणी प्रत्यक्षात वृक्षारोपण तर होते, मात्र, लावण्यात आलेल्या रोपट्यांचे योग्यप्रकारे संगोपन केले जात नसल्याने हजारो रोपे वृक्षात रुपांतरीत होण्याऐवजी जमीनदोस्त झाल्याचे दिसून येते.

त्यामुळेच सामाजिक वनीकरण विभागाची ‘झाडे लावा-झाडे जगवा’ ही माेहीम केवळ नावापुरतीच राहिल्याचे दिसून येत आहे. वृक्ष लागवडीसाठी तात्पुरता कार्यक्रम राबवल्यानंतर मात्र संगोपनाकडे दुर्लक्ष केले जात नसल्याने वृक्षारोपणाच्या उद्देशाला तडा गेला आहे. त्यामुळे आवश्यक उपाययोजना करण्याच अपेक्षा व्यक्त होत आहे.

मूर्तिजापूर तालुका : खापरवाडाते हिरपूर, उनखेड रंभापूर ते नागोली, जामठी ते आरखेड, मूर्तिजापूर ते किनखेड, दहितोंडा फाटा, बाळापूर तालुक्यात निमकर्दा ते बोरवाकळी, व्याळा ते बोरवाकळी, उरळ ते निंबा फाटा, वाडेगाव ते देगाव, वाडेगाव ते नकाशी, गुरुद्वारा ते कोळासा
अकोट तालुका : पुुंडाते कवडा, पळसो फाटा ते चोहोट्टा, मंचनपूर, पाणेट, मनात्री, निंबोळी, चिपी ते कऱ्ही, मनात्री ते दहिगाव फाटा, निंबोळी फळ वृक्ष लागवड

बार्शिटाकळी तालुका : टिटवाते उजळेश्वर, येवता ते कातखेडा, मोरगाव भाकरे ते राधास्वामी सत्संग, रेल्वेगेट ते बायपास, महान ते धाबा
अकोला तालुका : उगवा,घुसर ते सांगळूद, कपिलेश्वर ते कौलखेड गोमासे, भैयुजी महाराज संस्थान, ग्रामपंचायत मोरगाव भाकरे, रूपनाथ संस्थान दहिहांडा

लाखो रुपये पाण्यात
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेंतर्गत रस्त्याचे काम सुरू असताना दुतर्फा झाडे लावल्या जातात. त्याची निगा मात्र ग्रामसेवकांकडून घेतली जात नाही. खड्ड्यांच्या नावावर बिले काढण्यात धन्यता मानणाऱ्या ग्रामसेवकाविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे झाले आहे.

तपासणी गरजेची
विविध यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या वृक्षारोपण आकडेवारीचा अहवाल शासनाकडे फॉरवर्ड केला जातो. त्या अहवालानुसार प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन तपासणी करणे गरजेचे अाहे. त्यामुळे लावलेल्या झाडांपैकी प्रत्यक्षात किती झाडे जगली, याचा आढावा घेता येईल.

^वृक्षारोपण मोहीम आम्ही गंभीरपणे राबवण्याचा प्रयत्न करतो. संगोपनाची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. तरच वृक्षांची संख्या वाढू शकेल.'' गोविंदपांडे, जनसंपर्कअधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग