आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी धडकली ट्रकवर; वाहक ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाळापूर - पुणे-नागपूररातराणी बस सोमवारी पहाटे पावणेचार वाजता अकोला बसस्थानकावर पोहोचणार होती. मात्र, तत्पूर्वीच बस रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. बस वाहकाच्या दिशेने चिरत गेली. कॅबिनमध्ये चालकाच्या विरुद्ध बसलेल्या वाहकाचा यात जागीच मृत्यू झाला, तर दहा प्रवासी जखमी झाले. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर रिधोराजवळ घडली.
नागपूर अागाराची बस रविवारी सायंकाळी पुण्याहून नागपूरसाठी निघाली हाेती. लांबपल्ल्याची बस असल्यामुळे अकोला आगाराचे चालक जाकीर शेख आणि वाहक रवींद्र उदयसिंग किल्लेदार (वय ३८) यांनी औरंगाबाद आगारातून बसचा ताबा घेतला. त्यांची ड्युटी अकोल्यापर्यंत होती. त्यानंतर ते नागपूर आगाराच्या चालक वाहकाच्या ताब्यात बस देणार होते. रात्रीची वेळ असल्यामुळे वाहक रवींद्र किल्लेदार हे चालकाच्या शेजारी येऊन बसले होते, तर बसमध्ये १६ प्रवासी होते. बस अकोला आगारात १५ मिनिटात पोहोचेल, त्यापूर्वीच चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने रिधाेराजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन बस आदळली. ही बस वाहकाच्या दिशेने आदळल्यामुळे कॅबिनमध्ये बसलेला वाहक रवींद्र किल्लेदार यांचा जागीच मृत्यू झाला. बस इतकी भरधाव होती की काही अंतरावर बस चिरत गेली. चालक जाकीर शेख आणि बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. या वेळी रिधाेरा येथील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेतली पोलिसांना कळवले. पोलिसही तत्काळ दाखल झाले. त्यांनी जखमींना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार होऊन त्यांना सुटी देण्यात आली, तर बाळापूर पोलिस ठाण्यात बसमधील प्रवासी एसआरपीचे जवान महेश आनंदराव मेश्राम यांच्या तक्रारीवरून बसचालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघातात जखमी झालेल्यांमध्ये अाकाश प्रकाश मिसाळ, शिवानंद माधव जायभाये, दगडू वेणू बाभळे, मनिषा दगडू बाभळे, शांता दगडू बाभळे, अरुण ज्ञानदेव लेखणार, संगिता अरुण लेखणार, अॅड. नरहरी शंकरराव दाभाळकर, सागर शिवाजी खताळ, महेश आनंदराव मेश्राम यांचा समावेश आहे.

जखमींचीकेली विचारपूस : घटनेचीमाहिती मिळाल्यानंतर विभागीय वाहतूक अधिकारी सोले, क्षीरसागर, आगार व्यवस्थापक अभिजित कोरटकर, प्रशांत इंगळे, एसटी कामगार सेनेचे देवीदास बोदडे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेत जखमींची विचारपूस करत त्यांना मदत केली.

वडीलही होते परिवहन मंडळात
रवींद्र किल्लेदार यांचे वडील राज्य परिवहन महामंडळात नोकरीवर होते. वडिलांच्या नंतर त्यांनीसुद्धा एसटीतील नोकरी स्वीकारली होती. मुलांना शिकवून मोठ्या पदावर नोकरीस लावण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, त्यांच्या स्वप्नावर काळाने घाला घालून त्यांच्या कुटुंबाला दु:खाच्या खाईत लोटले.

किल्लेदार यांच्या मृत्यूने हळहळ
रवींद्र किल्लेदार हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमवते होते. त्यांच्या मागे पत्नी, सहा वर्षांचा मुलगा, आई अाणि अपंग असलेला भाऊ आहे. त्यांच्या कुटुंबाचा ते एकमेव कमवते आधार होते. त्यांच्या मृत्यूमुळे किल्लेदार कुटुंबासह गोरक्षण रोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भीषण अपघातामध्ये बसचा असा चुराडा झाला.