आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्येय उच्च ठेवून प्रयत्न करावे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जीवनातध्येय उच्च ठेवून प्रामाणिक प्रयत्न केल्याने यश नक्की मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले. स्व. डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात २५ सप्टेंबर रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन २००२ मध्ये या फोरमची स्थापना केली असून, यंदाचा हा फोरमचा १३ वा वर्धापन दिन आहे. सोहळ्यात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले. नुसते पद मिळण्यापुरते प्रयत्न करता, जीवनात प्रयत्नांना कधी अंत नसावा. प्रामाणिकपणे केलेल्या प्रयत्नांनी यश नक्की मिळते, असा सल्ला त्यांनी दिला.

विद्यार्थ्यांच्या यशात पालक आणि शिक्षकांचीदेखील महत्त्वाची भूमिका असते. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा नुसता विद्यार्थ्यांचा नसून पालकांचे समर्पणदेखील आवश्यक आहे, असे मत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयीन काळात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून प्रशासकीय सेवेत जाणे अभिमानास्पद आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या या फोरममुळे आज विद्यापीठातील बहुसंख्य विद्यार्थ्यांना फायदा झाला असून, दरवर्षी विद्यापीठाचे नाव उंचावत आहे, असे उद्गार कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी काढले.

फोरमचे अध्यक्ष अक्षय देशमुख यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संगमेश्वर केंद्र आरती येऊल यांनी केले, तर सूरज चांदुरकर यांनी आभार प्रदर्शन केले. या वेळी डॉ. व्ही. एम. भाले, डॉ. डी. एम. मानकर, डॉ. एन. बी. नागदेवे, कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, डॉ. एस. एस. माने, डॉ. व्ही. एस. भोंगे, डॉ. एन. डी. पारलवार, डॉ. वाय. बी. तायडे, एस. डी. कोकाटे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा सत्कार
एमपीएससीतसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्या फोरमच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी यासाठी विद्यापीठाला २०११-१२ मध्ये तृतीय पुरस्कार, तर २०१२-१३ मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला. पद्मा गोरे यांना इकॉनॉमिक्स बॉटनी या विषयात देशातून प्रथम क्रमांक मिळाला, तर दर्पण मानमोडे याने अॅग्रिकल्चर विभागातून राज्यातून प्रथम, तेजदीप ढगे याने अॅग्रिकल्चरल इंजिनिअरिंग विभागात राज्यातून प्रथम, तर फॉरेस्ट्री विभागात द्रोनकुमार मेश्राम याने राज्यातून द्वितीय येण्याचा मान पटकावला. अशोक यादव, योगेश येले, अनिल पाटीदार, नारायण बोरकर, अभिषेक वाघये, दापोली येथील विद्यापीठात सहायक प्राध्यापक हर्षवर्धन वाघ, नायब तहसीलदार आशिष सानप, नायक तहसीलदार विजय सुरडकर, नायब तहसीलदार हेमंत कांबळे, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर संकेत केदार, दीपक काळे, पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, अभिजित देरे, रामदास जाधव, धर्मेंद्र पवार या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.