आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tur 50 Percent Decline In Sales Of Pulses, Rs 200 Per Kg

तूर डाळीच्या विक्रीत ५० टक्के घट, भाव २०० रुपये प्रतिकिलो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तूरडाळींचे भाव गगनाला भिडल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. दोन दिवसांपूर्वी १८० रुपये किलो असलेले भाव आता २०० रुपये किलोच्या घरात पोहाेचले आहेत. गेल्या वर्षीपासून डाळींच्या भावात तेजी असली, तरी यंदा तुरीसोबतच उडीद, मुगाच्या डाळींनी उच्चांक गाठला आहे. सध्या तरी डाळींच्या भावात तेजी असली, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ घातलेल्या आयातीवरून भावांची चढउतार होण्याची शक्यता आहे.

दोन वर्षांपासून देशात पावसाचे अत्यल्प प्रमाण आणि पावसाच्या लहरीपणाचा परिणाम डाळवर्गीय पिकांवर होत आहे. त्यामुळे डाळींचे उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. गेल्या वर्षी डाळवर्गीय पिकांचे कमी उत्पादन झाल्यामुळे आज रोजीची बाजारपेठेतील त्यांची आवक कमी झाली. त्यामुळे डाळींचे भाव वाढले आहेत. यंदाही मूग आणि उडिदाचे उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे कधी नव्हे, यंदा उडीद आणि मुगाने १० हजार रुपये क्विंटलच्या वर झेप घेतली आहे. यंदाही राज्यभर पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे सर्वच पिकांना त्याचा फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात असलेल्या डाळींच्या दरांमध्ये आणखी २० ते ३० रुपयांनी वाढ झाल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

कृषी विभागाने द्यावे लक्ष
तूरपिकाच्या व्यवस्थापनासंबंधी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. पीक फुलोऱ्यात असताना या वेळी तूर पिकांवर अनेक संकटे येतात. कोणते कीटकनाशके फवारावे आणि कोणती फवारू नयेत, यासंबंधी शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसल्यामुळे याकडे कृषी विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

ऑक्टोबर,नोव्हेंबरमध्ये हवा पाऊस
तुरीचेपीक हे ऑक्टोबर महिन्यामध्ये फुलोऱ्यात असते. त्यामुळे पीक फुलोऱ्यात असताना त्याला पाण्याची आवश्यकता असते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पाऊस जर आला, तर तुरीचे चांगले पीक होते, अन्यथा या पिकाला फटका बसतो. तुरीचे उत्पादन विदर्भ आणि मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या भागात तुरीच्या कमी पेऱ्यासोबतच मराठवाड्याला सातत्याने दुष्काळाची झळ पोहोचत असल्यामुळे तुरीचे उत्पादन कमी होत आहे.

यादीतून डाळींचे नाव झाले बाद
^माझ्या दुकानातून दररोज १० किलो तूर डाळ विकल्या जायची. आता केवळ दोन किलो विकल्या जाते, तर नियमित येणाऱ्या अनेक ग्राहकांच्या यादीतून तूर, उडिदाच्या डाळींचे नाव बाद झाले आहे. भाववाढीमुळे अनेक लोकांनी डाळी खाण्याचे प्रमाण कमी केले आहे.'' महेशपंजवाणी, रामायण किराणा जवाहरनगर रोड

सोयाबीनचा पेरा वाढला तिपटीने
पाचते सहा वर्षांपासून सोयाबीनचा पेरा तिपटीने वाढला. कोरडवाहू शेतीतून वर्षाकाठी दोन पिके घेता यावीत म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली. पावसाळा चांगला झाल्यावर सोयाबीनच्या काढणीनंतर त्यामध्ये रब्बीचा हरभऱ्याचे चांगले उत्पादन होऊ लागले. त्यामुळे कापूस या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून घेतले जाणारे तुरीचे पीकही कमी झाले.