आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टू इन वन’ मशीनने शेंगा सोलणे झाले सोपे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बाजारातील मुगाच्या किंवा वाटाण्याच्या हिरव्या शेंगा सोलून त्यातून दाणे वेगळे करायला बराच वेळ द्यावा लागतो. हेच दाणे जर बाजारात सोलून भेटले, तर गृहिणींना सोयीचे होईल, त्याच प्रमाणे शेतकऱ्यांनाही त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळेल. शेतकऱ्यांना व्यवसायाला पूरक अशा शेंगांमधून दाणे वेगळे करणारे यंत्र उपलब्ध आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कापणी पश्चात तंत्रज्ञान विभागाने हे ‘टू इन वन’ मशीन तयार केले आहे. या टू इन वन मशीनमुळे शेंगा सोलणे सोपे झाले असून, शेतकऱ्यांना स्वत:चा उद्योग करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

यंत्राच्या साहाय्याने एका तासात २५ किलो हिरव्या तुरीच्या शेंगा सोलून दाणे वेगळे करता येतात. या शेंगा चिकट असल्याने किंवा पासमधून संपूर्णपणे दाणे वेगळे होतात. एका तासात ३६ किलो हिरव्या वाटाण्याच्या शेंगांमधून दाणे काढता येतात. हे यंत्र जवळपास ६० ते ७० हजार रुपयांत उपलब्ध आहे. विद्यापीठातील कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागातील कापणी पश्चात तंत्रज्ञान विभागप्रमुख, संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर, सहायक संशोधन अभियंता राजेश मुरुमकार, वरिष्ठ संशोधन अभियंता महेंद्रसिंह राजपूत यांनी हे यंत्र तयार केले.

हरभऱ्यासाठी प्रयोग
शेतकऱ्यांना,बचत गटांना उद्योग सुरू करता येतो. याच यंत्रातून हरभऱ्याचे दाणे वेगळे करता येतात की नाही, याबाबत प्रयोग करणार आहे. तसे झाल्यास हे यंत्र थ्री इन वन होऊन, शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरू शकेल.'' डॉ.प्रदीप बोरकर, संशोधन अभियंता, विभागप्रमुख

व्यवसायाला पूरक
शेतातूनहिरव्या शेंगा बाजारात विकायला पाठवण्याऐवजी त्याचे दाण्याचे पॅकेट पाठवले, तर ते अधिक फायद्याचे ठरू शकते. यंत्राच्या साहाय्याने एक किलो शेंगांतील दाणे वेगळे करण्यासाठी दीड ते दोन रुपये खर्च येतो. त्यामुळे हे यंत्र शेतकऱ्यांच्या उपयोगाचे आहे.

असे काम करते हे यंत्र
यंत्रातवरच्या ट्रेमध्ये टाकलेल्या शेंगा खालील दोन रोलरमधून जाऊन त्यातील दाणे वेगळे होतात. चाळणीच्या माध्यमातून दाणे एकीकडे टाकले जातात. त्याखाली आणखी एक रोलर आणि अशीच एक चाळणी लावलेली आहे. ज्यामुळे शेंगांतील दाणे पूर्णपणे निघतील. अशा प्रकारे दाणे एकीकडे तर शेंगांचे टरफल एकीकडे टाकले जातात. जर दाणे व्यवस्थित निघाले नाही, तर ते परत मशीनमध्ये टाकता येते. अशा प्रकारे जवळपास ते पासमध्ये पूर्णपणे दाणे वेगळे होतात. हिरव्या वाटाण्याच्या शेंगांमधून दाणे वेगळे करण्यासाठी या यंत्रातील रोलर, चाळणी बदलावी लागते. प्रक्रिया सारखीच आहे.