आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन लाखांच्या बनावट नोटा मलकापुरात जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर - स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून दाेन लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका ३३ वर्षीय इसमास पकडून त्यास अटक केली आहे. ही कारवाई १३ जानेवारीच्या रात्री १० वाजेच्या सुमारास मलकापूर बसस्थानकावर कारण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पी. डी. शिकारे यांना नवी दिल्ली येथील नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे विनोदकुमार नायर यांनी मलकापूर येथे एका जणाकडे बनावट नोटा आहेत. या नोटा तो काळ्या बाजारात चलनात आणणार आहे, अशी माहिती दिली. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री मलकापूर येथे धाव घेऊन बसस्थानकासमोर औरंगाबादेतील गारखेडा परिसरास वास्तव्यास असलेल्या मनोहर एकनाथ कापसे (३३) यास पकडले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे रोख ६४ हजार रुपये एक लाख ९५ हजारांच्या बनावट नोटा आढळल्या. बनावट नोटांमध्ये एक हजार रुपयांच्या शंभर पाचशेच्या १९० नोटांचा समावेश आहे. या सर्व नोटा पोलिसांनी जप्त करून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अार. एस. सोनवणे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांत मनोहर कापसेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजयकुमार बाविस्कर, अप्पर पोलिस अधीक्षक श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेेचे पोलिस निरीक्षक शिकारे, पोलिस उपनिरीक्षक सोनवणे, विकास खानजोडे, विलास साखरे, अत्ताउल्लाखान, भारत जंगले, नीलेश वाकडे विनोदकुमार शिवरामन नायर यांनी केली. पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिकारे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सोनवणे करत आहेत. मनोहर कापसे हा मूळचा देवी गव्हाणा ता. जाफ्राबाद जि. जालना येथील आहे.
बातम्या आणखी आहेत...