आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायपिंगची टक टक आणखी वर्षभर लांबली, डिसेंबर २०१६ मार्च २०१७ या महिन्यात आणखी दोन परीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - टायपिंगची टक टक आणखी काही काळ सुरू ठेवण्यासाठी संस्थाचालकांनी सुरू ठेवलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. शासनाने आणखी दोन परीक्षा घ्यायचा निर्णय घेतला असून, डिसेंबर २०१६ मार्च २०१७ या महिन्यात या परीक्षा घेतल्या जातील.
अकोला येथील टंकलेखन संस्थेच्या संचालकांनी या मागणीसाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या नेतृत्वात टंकलेखन संस्थाचालकांच्या राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली.
टायपिंगच्या परीक्षांना मुदतवाढ देणे कसे गरजेचे आहे, हे या वेळी पटवून देण्यात आले. त्यामुळे या वर्षीच्या डिसेंबरसह मे २०१७ मध्ये टायपिगंची परीक्षा घेतली जाणार आहे. शिक्षणमंत्र्यांच्या दालनातील चर्चेअंती स्वत: शिक्षणमंत्र्यांनीच टायपिंगची परीक्षा घेणाऱ्या पुण्याच्या म. रा. परीक्षा परिषदेच्या आयुक्तांशी बोलून यासंदर्भातील कारवाई पुढे रेटण्याचे निर्देश दिले.
कॉम्प्युटर टायपिंग हा पर्याय पुढे करत राज्य शासनाने परंपरागत (मॅन्युअल) टायपिंग हा प्रकार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आघाडी सरकारच्या काळातच घेतला गेला. हे करत असताना टंकलेखन संस्थांना कॉम्प्युटर टायपिंगची मान्यता देण्याचे कामही सुरू केले गेले. मात्र, त्यासाठीचा अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती, आवश्यक असलेल्या तज्ज्ञांची जुळवाजुळव या सर्व बाबी अर्धवट ठेवल्या गेल्या. त्यामुळे ना धड टायपिंग इन्स्टिट्यूट... ना धड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, अशी या संस्थांची स्थिती झाली. यातून मार्ग काढण्यासाठी कॉम्प्युटर टायपिंगची सुटसुटीत पद्धत अंमलात येईस्तोवर मॅन्युअल टायपिंगची पद्धत सुरू ठेवा, अशी रास्त मागणी टंकलेखन संस्थाचालकांच्या संघटनेकडून पुढे आली होती.

त्यासाठी २०११ पासूनच शासन-प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू झाला होता. अखेर मंगळवारी या प्रयत्नांना यश आले असून, मे २०१६ मध्ये मॅन्युअल टायपिंगवर कालबाह्यतेची मोहोर लावणाऱ्या राज्य सरकारने पुन्हा एका वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे डिसेंबर २०१६ मे २०१७ या महिन्यात पुन्हा एकदा मॅन्युअल टायपिंगची परीक्षा घेतली जाणार आहे. शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयानंतर प्रशासकीय पातळीवर तशी तयारीही सुरू झाली आहे. लवकरच याबाबतचा लेखी आदेशही सर्व जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी संबंधित संस्थाचालकांना पाठवले जाणार आहेत. चर्चेदरम्यान अकोल्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, शिक्षण तज्ज्ञ डॉ. विजयराव काकडे, हिंगोलीचे आमदार तानाजीराव मुटकुळे, कोल्हापूरचे आमदार क्षीरसागर, संस्थाचालकांच्या संघटनेचे वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गोवर्धन वीरकुंवर, संस्थापक सदस्य एच. ए. मेहता, अकोल्याचे ज्येष्ठ पदाधिकारी विठ्ठलराव अढाऊ, जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र तेलगोटे, संतोष कदम, रवींद्र सावरकर, अभिलाषा नाईक, जयश्री पाटील मुंबई, कोल्हापूर येथील प्रतिनिधी उपस्थित होते.

संस्थाचालक सुखावले
दोन परीक्षांपर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याने राज्यभरातील टायपिंगचे संस्थाचालक सुखावले अाहेत. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना परवडणारा अभ्यासक्रम आणखी वर्षभर सुरू राहणार असून, तेवढा काळ टायपिंगच्या टक-टकचे स्वरही कानी पडणार आहेत. दरम्यानच्या काळात कॉम्प्युटर टायपिंगच्या अभ्यासक्रमाची सुटसुटीत मांडणी करणे शासनाला सहज शक्य होईल, असे टायपिंगच्या संस्थाचालकांचे म्हणणे आहे.

सर्वांचे सविनय आभार
^‘दिव्य मराठी’नेआमची बाजू समजून पाठपुरावा केला, त्याबद्दल धन्यवाद! अनेक मान्यवरांची मदत झाली. त्यांच्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करताे. -व्यंकटेश कुटे,अकोला.
का होता आग्रह?
हाअभ्यासक्रम नोकरीसाठी साहाय्यभूत असून, सामान्यांच्या आवाक्यात आहे. गाव-खेड्यातील गरिबांना तो परवडतो. तो एकाएकी बंद झाल्यास संस्थाचालकांसह टाईपरायटरचे मेकॅनिक, पेंटर, सॉल्डरवाले यांचा रोजगार धोक्यात येईल, असे संस्थाचालकांचे म्हणणे होते.
बातम्या आणखी आहेत...