आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफीच्या अर्जासाठी शेतकऱ्यांकडून अवैध वसुली, प्रशासनाकडून होतेय दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो. - Divya Marathi
फाईल फोटो.
बुलडाणा - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकरी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत असताना जिल्ह्यातील शेतकरी आपले सरकार, महा सेवा केंद्र सीएससी केंद्रावर गर्दी करत आहे. याच संधीचा फायदा घेऊन काही सेतू केंद्र धारक शेतकऱ्यांकडून नियमबाह्य ५० ते १०० रुपये उकळत आहेत.
 
या माध्यमातून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. शुक्रवार, १५ सप्टेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याने अनेक शेतकरी सेवा केंद्राकडे धाव घेतील. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 
 
मागील काही महिन्यांपूर्वी शासनाने ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु घोषणा होऊन कितीतरी दिवसांचा कालावधी उलटला असताना देखील शासनाने या घोषणेची अंमलबजावणी केली नाही. दरम्यान शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनांसह विरोधी पक्षांनी आंदोलने केली होती. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने काही दिवसांपूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सांगितले होते. यासाठी शेतकऱ्यांना अर्जासोबत बँकेचे कर्जाचे विवरणपत्र, पती पत्नी दोघांचे आधार कार्ड, यासह इतर कागदपत्रे स्कॅनिंग करून अर्ज सादर करावा लागत आहे. यासाठी शासनाने जिल्ह्यात हजार ८९२ सेवा केंद्र सुरू केलेले आहेत. 

वास्तविक पाहता अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने सेतू केंद्र संचालकांना १० रुपये देण्याचे सांगितले होते. परंतु काही संचालक पैशाच्या हव्यासापोटी माहिती अपलोड करण्यासाठी शेतकऱ्यांकडून ५० ते १०० रुपये, तर अर्जासाठी प्रत्येकी 5 रुपये वसूल करत आहेत. काही शेतकऱ्यांनी मोफत अर्ज भरण्यास सांगितले असता, केंद्र संचालक विविध तांत्रिक अडचणी पुढे करून त्यांना वेठीस धरत आहेत. त्यातच ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना पत्नीसह सेतू सेवा केंद्रांवर जावे लागत असल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे त्यांना दोन ते तीन दिवस चकरा मारावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला. सेतू सेवा केंद्र धारकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 
 
जिल्ह्यात 1 हजार ८९२ सेतू सेवा केंद्राची संख्या : जिल्ह्यात एकूण हजार ८९२ सेतू सेवा केंद्राची संख्या असून त्यामध्ये आपले सरकार ९७२, महा सेवा २४१ ६७९ सीएससी केंद्राचा समावेश आहे. या केंद्रावर जाऊन शेतकरी कर्ज माफीचा अर्ज भरत आहेत. 
 
भारनियमनामुळे दुष्काळात तेरावा महिना : मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात चक्क चार ते पाच तासांचे भारनियमन केले जात आहे. या भारनियमनाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांचे अर्ज भरणाऱ्या सेतू सेवा केंद्राला बसत आहे. त्यामुळे हे भारनियमन शेतकऱ्यांसाठी दुष्काळामध्ये आता तेरावा महिना ठरत आहे. 
 
आज उडणार शेतकऱ्यांची झुंबड 
आतापर्यंत जिल्ह्यातील लाख २७ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज सादर केले आहेत. १५ सप्टेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याने शेतकऱ्यांची अर्ज भरण्यासाठी गर्दी होणार आहे. 
 
सव्वादोन लाख शेतकऱ्यांचे अर्ज 
जिल्ह्यातील आपले सरकार, महाई सेवा सीएससी केंद्र अशा एकूण 1 हजार ८९२ सेतू सेवा केंद्राच्या माध्यमातून आज १४ सप्टेंबर ११.३० वाजेपर्यंत 2 लाख २७ हजार शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरले आहेत. 
 
वसुलीसाठी तांत्रिक अडचणींचा आधार : कर्जमाफीचे अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी पैसे दिल्यास कनेक्टिव्हिटी नाही, स्कॅनर खराब आहे, तसेच इतर तांत्रिक कारणे सांगितली जात आहे. तर दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिल्यास त्याचे काम लवकर केल्या जाते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकूण संख्या पाहता त्यांच्याकडून वसूल होणारी रक्कम एक कोटीपेक्षाही अधिक आहे. 
बातम्या आणखी आहेत...