अकोला - शहरातील किती अल्पवयीन विद्यार्थी दुचाकी चालवतात, याचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी माउंट कारमेल या शाळेत गुरुवारी दोन तास घालवले. एवढेच नव्हे तर त्यांनी शोधलेल्या ४० विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांचा वर्ग घेतला. तसेच त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले शाळा व्यवस्थापनावरसुद्धा कारवाईचा इशारा दिला.
दहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्वत: दुचाकीवरून शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांना अडवले होते. त्या वेळी विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून समज दिली होती. एवढेच नव्हे तर आपल्या मुलांच्या हाती दुचाकी देऊ नये, असे आवाहनही केले होते. मात्र, त्याला पालकांनी प्रतिसाद दिला नाही. गुरुवारी सकाळी संविधान दिनानिमित्त वसंत देसाई क्रीडांगणामध्ये एकता दौडचे आयोजन केले होते. या वेळी सकाळी वाजताच्या सुमारास त्यांना लहान मुले दुचाकीने कारमेल शाळेमध्ये जाताना दिसले. त्यानंतर त्यांनी दुपारी दोन वाजता कारमेल शाळेत धडक दिली. या वेळी त्यांनी स्वत: दुचाकी घेऊन कोण कोण विद्यार्थी शाळेमध्ये आले, अशांची माहिती घेतली. स्वत: मुलांची चौकशी करून अल्पवयीन दुचाकीस्वार मुलांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून पालक विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला. या वेळी त्यांनी शहरामध्ये अपघातांच्या वाढत्या प्रमाणाबाबत माहिती दिली. स्वत:हून अपघाताला निमंत्रण का देता म्हणून पालकांना सुनावले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावकार वाहतूक पोलिस उपस्थित होते.
पालकांकडून घेतले लेखी : तुमचामुलगा दुचाकीने शाळेत येतो, तो यापुढे दुचाकी घेऊन शाळेत येणार नाही, जर आला तर त्याच्या बदल्यात तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. वाहन जप्तीची कारवाईसुद्धा करण्यात येईल, अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पालकांकडून लिहून घेतले.
मुख्याध्यापक,शिक्षकही जबाबदार : मुलेशाळेत कशाने येतात, ते दुचाकी घेऊन येतात की स्कूल बसने याची जबाबदारी शाळेची आहे. मात्र, याकडे शहरातील शाळांचे दुर्लक्ष होत आहे. ही बाब गंभीर आहे. यापुढे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना जबाबदार धरण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
पालकांची बैठक : अल्पवयीनदुचाकी चालवणाऱ्या पालकांच्या मुलांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून शाळा व्यवस्थापनाने बोलावले. यामुळे पालकांची तारांबळ उडाली होती. एकापाठोपाठ पालकांची त्यांनी सुनावणी घेतली. या वेळी अपघातांच्या बाबतीत त्यांनी पालकांना सजग केले.
शहरातील शाळांना पत्र
शाळांमध्ये दुचाकीवरून येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती शाळांनी घ्यावी. अशा विद्यार्थ्यांना दुचाकीने शाळेत येण्यासाठी मज्जाव करावा, अशा अाशयाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी शिवाजी महाविद्यालयाने केली. इतर शाळांनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राची दखल घेतली नाही. त्यामुळे शहरात अल्पवयीन विद्यार्थी सुसाट आहेत.
यापुढे दुचाकी देणार नाही
तुमच्या मुलांची काळजी तुम्हाला नाही, गेल्या आठवड्यात एका कॉलेजच्या तरुणीचा अपघातात मृत्यू झाला. यापूर्वी शहरात अपघातांची मालिका सुरू आहे, असे असताना तुम्ही एवढे बिनधास्त कसे, असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी विचारल्यावर पालकांची बोलती बंद झाली. साहेब, यापुढे आम्ही मुलांच्या हाती दुचाकी देणार नाही, असे आश्वासन पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
दुचाकी चालवणाऱ्या शाळकरी अल्पवयीन मुलांच्या पालकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला.