आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प विदर्भासाठी वरदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्याची भौगोलिक स्थिती, पुढील ५० वर्षांत वाढणारी लोकसंख्या, काटेपूर्णा प्रकल्पाचे आयुष्यमान या सर्व बाबी लक्षात घेता, वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प अकोला जिल्ह्यासाठी जीवनदायी ठरणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील काटेपूर्णा, उमा, मन या नद्यांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याने भविष्यातील पाणीटंचाईपासून जिल्ह्याला मुक्ती मिळू शकते. अकोलासह विदर्भातील अनेक गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रकल्पाचे काम २००९ मध्ये झालेल्या सर्वेक्षणावरच थांबले आहे.
अकोला जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ पाच लाख ४३ हजार हेक्टर आहे. यापैकी एक लाख ९३ हजार हेक्टर क्षेत्र (३६ टक्के) खारपाणपट्ट्यात आहे. जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेता, सपाट जागा नसल्याने मोठा प्रकल्प उभारणे शक्य नाही, तर दुसरीकडे जिल्ह्यात सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात ६.३२ दशलक्ष घनमीटर (८ टक्के) गाळ साचला आहे. प्रकल्पांच्या आयुष्यमानाच्या अनुषंगाने विचार केल्यास मोठ्या प्रकल्पांचे आयुष्यमान ८० ते १०० वर्ष तर लघू प्रकल्पांचे ६० वर्ष. या दृष्टीने विचार केल्यास वयाची पंचेचाळिशी गाठलेला काटेपूर्णा प्रकल्प येत्या ५० वर्षांत भरू शकतो. त्यामुळे प्रकल्पाची साठवण क्षमता अत्यल्प होईल, तर दुसरीकडे ५० वर्षांनंतर महापालिका तसेच जिल्ह्याच्या लोकसंख्येत दुपटीने वाढ होईल. तूर्तास शहराची लोकसंख्या पाच लाख तर जिल्ह्याची १८ लाख आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, ५० वर्षांनंतर पैसे मोजूनही पाणी मिळणे अशक्य बाब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्प पूर्ण झाल्यास भविष्यातील पाणीटंचाईवर सहज मात करता येणे शक्य आहे.

पूर्व विदर्भात असलेल्या वैनगंगा खोऱ्यात ११७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी आहे. वैनगंगा प्रकल्पामुळे ५७ टीएमसी (२८.३२ दशलक्ष घनमीटर म्हणजे एक टीएमसी) पाणी अडवले गेले आहे, तर उर्वरित पाणी प्रकल्प नसल्याने वाहून जाते. या सर्व बाबी लक्षात घेऊन राष्ट्रीय जलविज्ञान प्राधिकरण (हैदराबाद) ने २००९ ला सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार वैनगंगा प्रकल्पातून सोडलेले पाणी ४७८ किलोमीटर लांबीच्या मोठ्या कालव्याच्या माध्यमातून नळगंगा नदीत आणल्या जाऊ शकते. यासाठी त्या वेळी आठ हजार ३०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु, या अहवालावर दुर्दैवाने कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळेच हा प्रकल्प पूर्ण झाल्यास जिल्ह्याला पाणीटंचाईपासून कायमस्वरूपी मुक्ती मिळू शकते.

सिंचन अनुशेषही भरून निघणार
या नदी जोड प्रकल्पामुळे मुबलक पाणी उपलब्ध होऊन दोन लाख ९० हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. त्यामुळे विदर्भाचा सिंचन अनुशेषही भरून निघणार आहे. या सर्व प्रकारामुळे हा नदी जोड प्रकल्प केवळ अकोला जिल्ह्यालाच नव्हे तर विदर्भासाठीच जीवनदायी ठरणार आहे.

अन्यथा आंध्र प्रदेशला मिळेल फायदा
वैनगंगा खोऱ्यात ५७ टीएमसी पाणी अडवले आहे. अद्यापही ६० टीएमसी पाणी शिल्लक आहे. नदी जोड प्रकल्पाचे काम सुरू झाल्यास या पाण्याचा फायदा विदर्भाला मिळेल. परंतु, प्रकल्पाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यास आणि आंध्र प्रदेशने वैनगंगा प्रकल्पावर प्रकल्प उभारल्यास त्याचा फायदा केवळ आंध्र प्रदेशलाच मिळेल.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यास फायदा
या नदी जोड प्रकल्पामुळे विदर्भातील केवळ एखाद्या जिल्ह्यालाच नाही तर संपूर्ण विदर्भाला फायदा मिळणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात तापी खोऱ्यातील नळगंगा प्रकल्पात अत्यल्प जलसाठा उपलब्ध होतो. त्यामुळे हा प्रकल्प झाल्यास पूर्व आणि पश्चिम विदर्भाला पूर्णपणे फायदा मिळणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातीने लक्ष घालावे लागेल.

उप कालव्यांमुळे होईल फायदा
४७८ किलोमीटर लांबीच्या या कालव्याला दहा उप कालवे आहेत. या उप कालव्यांमुळे नागपूर आणि अमरावती विभागातील अनेक नद्यांना पाणी उपलब्ध होईल. यात नागपूर विभागातील उमरेड, बोर, रोहणा, अमरावती विभागात निम्न वर्धा, बेंबळा, अमरावती, उमा, काटेपूर्णा, मन या नद्यांना वैनगंगेचे पाणी मिळणार आहे. या नद्यांच्या माध्यमातूनच पुढे तापी खोऱ्यातील नळगंगा नदीला पाणी मिळेल.