आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसंत राज्य कृषी प्रदर्शन २७ पासून, कृषी उत्पन्न समितीत प्रदर्शनस्थळाचे भूमिपूजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला कृषी उत्पन्न समितीच्या आवारामध्ये २७ ते ३० जानेवारी दरम्यान वसंत २०१७ राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी विभाग, राज्य कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने होणारे प्रदर्शन शेतकरी आणि शेतीच्या उत्थानाचा विषय डोळ्यासमोर ठेवून भरवण्यात येत असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषदेत दिली. 

राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पणन मंत्री सुभाषराव देशमुख यांच्या उपस्थितीत उदघाटन होणार असून स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी प्रमुख अतिथी राहणार आहेत. लाख कास्तकार शेतकऱ्यांना भेट देतील यादृष्टीने चार एकराच्या जागेवर आयोजित प्रदर्शनात २०० वर कंपन्यांचा सहभाग राहणार आहे, असेही धोत्रे यांनी सांगितले. 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात देणे, शेतकऱ्यांच्या होतकरू मुलामुलींना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, शेतीसाठी आधुनिक यंत्रे, अवजारे अनुदानावर देणे, शेतकऱ्यांना मालतारणाची व्यवस्था आदी उपक्रम बाजार समितीच्या माध्यमातून राबवण्यात येतात. १३० वर्षांची समृद्ध परंपरा कृषी उत्पन्न बाजार समितीला असून ज्येष्ठ मार्गदर्शक वसंतराव धोत्रे यांच्या मार्गदर्शनात वाटचाल सुरू आहे. शेतकऱ्यांना लाभ व्हावा हा उद्देश समोर असल्याचे शिरीष धोत्रे यांनी सांगितले. 

जय गजानन कृषी मित्र परिवार, अकोला कृषी व्यावसायीक संघ यांचेही सहकार्य आहे. शेतकरी, महिला बचत गट यांची उत्पादने प्रदर्शनात राहतील. कास्तकार तसेच शेतीविषयी आस्था असणाऱ्यांचा सहभाग यामध्ये राहील. विविध पिकांवरील कार्यशाळा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार आहे. 

पत्रकार परिषदेला उपसभापती निळकंठराव खेडकर, समिती सदस्य राजेश बेले, ज्ञानेश्वर महल्ले, जे. टी. कराळे, सुनील मालोकार, सुरेश मुंदडा, राधेश्याम चांडक यांंच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. आयोजनामध्ये वर्षाताई गावंडे, अर्चनाताई मुरुमकार, मंदाकिनी पुंडकर, चंदू चौधरी, दिगांबरराव गावंडे, रविकांत राऊत, बाबुराव गावंडे, विठ्ठलराव चतरकर, विद्याताई गावंडे, सुनील परनाटे, रमेशचंद्र चांडक, प्रकाशराव काळे, अॅड. अभय थोरात, प्रतिभाताई अवचार, अभिमन्यू वक्टे, देवेंद्र देवर, प्रमोद लाखे, संदीप पळसपगार, चंद्रशेखर खेडकर, सुरेश सोळंके, जयंतराव मसने, सुनील मालोकार यांच्यासह समितीचे अधिकारी, कर्मचारी आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत, अशी माहिती देण्यात आली. जगन्नाथ कराळे यांनी परिसंवादाबाबत सांगितले. 

आदर्श शेतकऱ्यांच्या हस्ते भूमिपूजन 
आदर्श शेतकरी किरण पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे भूमिपूजन करण्यात आले. सभापती शिरीष धोत्रे, उपसभापती निळकंठ खेडकर, राजू बेले, प्रदीप खाडे, सचिन मोरे, जगन्नाथ कराळे, अविनाश पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.