आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालेभाज्यांनी शंभरी गाठल्याने काेलमडले गृहिणींचे बजेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भूगर्भातील जलपातळीत घट आल्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांनी पालेभाज्यांचे उत्पादन घेण्यास नापसंती दर्शवली होती. त्याचा परिणाम आता भाजी बाजारात दिसून येत आहे. पालेभाज्यांचे भाव शंभर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे भाजी बाजाराचे पिशवीचे ओझे कमी झाले आहे. शेतातील पाणीटंचाईचा परिणाम स्वयंपाकघरापर्यंत प्रभावित करणारा ठरला आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट विस्कळीत झाले आहे, तर सामान्य ग्राहकांकडून होणाऱ्या पालेभाज्यांच्या मागणीवर परिणाम झाला आहे.
गेल्या वर्षभरात पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे बागायती क्षेत्रातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. परिणामी पालेभाज्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्ह्यात संख्या घटली आहे. गत दोन वर्षांपासून पालेभाज्यांचे जिल्ह्यातील उत्पादन कमी होत आहे. अशातच अल्प पर्जन्यमानामुळे या वर्षी शेतातील विहिरी कूपनलिका आटल्या आहेत. तेेव्हा पिकांचे उत्पादन घ्यावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. पालेभाज्यांना पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे पालेभाज्यांच्या बाबतीत स्वावलंबी असलेल्या जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून पालेभाज्या विक्रीसाठी येत आहेत. गेल्या एक ते दीड महिन्यांपासून पालेभाज्यांचे भाव वाढते आहेत. वीस दिवसांच्या अंतरातच विविध भाज्यांचे भाव प्रती किलोमागे ते रुपयांनी वाढले आहेत. भाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींचा बजेट विस्कळीत झाला आहे. त्यामुळे आठवड्याभरातील जेवणात कितीवेळा कोणत्या भाज्या कराव्या याबाबतचे नियोजन या भाववाढीमुळे त्यांना करावे लागत आहे. त्याचाच परिणाम म्हणून बाजारात भाजी घेण्यासाठी आलेल्या सामान्य ग्राहकांच्या पिशव्यांचे ओझे कमी झाल्याचे दिसून येते. दुसरीकडे सध्या एक किलो भाजीच्या रुपयांमध्ये बाजारात दीड ते दोन किलो आंबे मिळत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

बंगळुरूचेटमाटर अकाेल्यात : भाजीबाजारात टमाटर सध्या ८० रुपये प्रती किलोने विक्री होत आहेत. बाजारात नाशिक बंगळुरूचे टमाटर विक्रीसाठी आले आहेत. अकाेला जिल्ह्यात टमाटर नसल्यामुळे साडेपाचशे कॅरेटचे साडेसात लाख रुपये द्यावे लागत असल्याची माहिती आहे.
भाज्यांचे नियोजन
भाव वाढल्याने दररोज स्वयंपाकात होणाऱ्या भाज्यांचे नियोजन करावे लागत आहे. पालेभाज्या महागल्या तरीसुद्धा कमी का होईना त्या घ्याव्याच लागतात. त्यामुळे आवडी-निवडीला प्रसंगी बाजूला ठेवत भाज्यांमध्ये पर्याय स्वीकारावा लागत असल्याचे साईनगरातील गृहिणी स्वातीताई देशमुख यांनी सांगितले.

मागणी घटली
पाण्याची पातळी खालावल्याने पालेभाज्यांचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या उत्पादित पालेभाज्यांची विक्री आपल्या बाजारात होत आहे. भाववाढीमुळे थोडी फार पालेभाज्यांची मागणी सामान्य परिस्थितीत ग्राहकांकडून घटल्याचे बाजारातील भाजी विक्रेते शांताराम महल्ले यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...