आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांच्याविषयी अद्यापही प्रतिक्षाच; नऊ दिवसांचा कालावधी उलटला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- जितेंद्र वाघ यांची अकोला महापालिका आयुक्तपदी नियुक्ती होवून नऊ दिवसाचा कालावधी झाला आहे. मात्र ते रुजु झाल्याने महापालिकेचे नवे आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या बद्दल अकोलेकरांना अद्यापही प्रतिक्षा करावी लागत आहे. दरम्यान त्यांना अद्याप रिलिव्हचे आदेश मिळाले नसल्याची माहिती मिळाली आहे. 


अजय लहाने यांची बदली होऊन तीन महिन्याचा कालावधी झाला होता. मात्र नगरविकास विभागाने त्यांना रिलिव्ह केले नव्हते. त्यामुळेच बदली होवूनही अजय लहाने अकोला आयुक्तपदी कायम होते. मात्र १० नोव्हेंबरला त्यांना रिलिव्हचे आदेश मिळाले, त्याच बरोबर मुंबई महानगर प्रदेश विकास येथे प्रतिनियुक्तीवर असलेल्या जितेंद्र वाघ यांची अकोला मनपाच्या आयुक्तपदी एक वर्षासाठी नियुक्ती केल्याचेही आदेश धडकले आहे. त्यामुळे अकोल्याशी परिचित असलेले जितेंद्र वाघ महापालिकेच्या आयुक्तपदी केव्हा रुजु होतात? याबाबत प्रतिक्षा लागली आहे. त्यांच्या रुजु होण्याबाबत तर्क वितर्क लढवले गेले. काहींच्या मते ते या आठवड्यातच रुजु होणार होते. मात्र हा आठवडा संपुष्टात येत असला तरी अद्याप ते रुजु झालेले नाही. 


दरम्यान आयुक्तपदाचा प्रभार जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांंडेय यांच्याकडे देण्यात आला आहे. परंतु जिल्हाधिकारीही रजेवर गेल्याने तूर्तास महापालिकेत अधिकाऱ्यांची वानवा आहे. तूर्तास अतिरिक्त आयुक्त दीपक पाटील तसेच उपायुक्त समाधान सोळंके महापालिकेत कायम आहेत. परंतु समाधान सोळंके यांना रिलिव्ह केल्याची माहिती आयुक्तांच्या बदली नंतरच मिळाली होती. तर दुसरीकडे लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे ते अडचणीत आले आहेत. तर मुख्य लेखा परीक्षक सुरेश सोळंके, नगररचनाकार प्रणव कर्पे दिर्घ रजेवर गेले आहेत. या सर्व प्रकारामुळे महापालिकेतील कामकाज ढेपाळले असून नागरिकांची कामेही रखडली आहेत. त्यामुळेच जो पर्यंत जितेंद्र वाघ रुजु होत नाहीत, तो पर्यंत महापालिकेच्या कामाचा गाडा सुरळीत होणार नाही. त्यामुळेच कर्मचाऱ्यांसह अकोलेकर नव्या आयुक्तांच्या प्रतिक्षेत आहेत. 


अद्याप ‘रिलिव्ह’चे आदेश मिळाले नाहीत 
महापालिका आयुक्तपदी बदली झाल्याचे आदेश मला प्राप्त झाले आहेत. मात्र अद्याप मुंबई महानगर प्रदेश विकास येथून रिलिव्हचे आदेश प्राप्त झालेले नाहीत. ज्यावेळी रिलिव्हचे आदेश प्राप्त होतील, त्यावेळी मला रुजु होता येईल.
- जितेंद्रवाघ, नवनियुक्त महापालिका आयुक्त. 

बातम्या आणखी आहेत...