अकोला - यावर्षी फेब्रुवारीतच उन्हाचे चटके जाणवू लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महाशिवरात्रीनंतर उन्हाळ्याला सुरुवात होते. मात्र, यंदा त्यापूर्वीच उन्हाची तीव्रता अधिक असल्याने नागरिक त्रासले आहेत.
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोल्याचे तापमान सर्वाधिक राहते. एप्रिल, मे या महिन्यांत जिल्ह्यातील तापमानाचा पारा अक्षरश: ४७ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचतो. अशात मार्च महिन्यातच तापमानाचा आलेख वाढत असल्याने मे महिन्यात किती तापमान राहील, याचा विचार करूनच अकोलेकरांच्या अंगावर काटे उभे राहत आहेत. लवकरचहोईल "हीट अॅक्शन प्लॅन' : अलीकडे फेब्रुवारीतच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. उन्हाचा वाढता आलेख लक्षात घेऊन शासनाने "हीट अॅक्शन प्लॅन' तयार केला आहे. नागपूरच्या बैठकीत संबंधित शासकीय रुग्णालयांना "प्लॅन'बद्दल माहिती दिली. अकोल्याचे डॉ. गिरी या बैठकीस उपस्थित होते. "प्लॅन'चे नोडल अधिकारी म्हणून ते काम पाहतील. "प्लॅन'अंतर्गत चौकाचौकांत तापमान दर्शवणारे फलक लावले जातील. "जागोजागी पाण्याची व्यवस्था जनजागृती करून उष्माघात कसा टाळता येईल, यासाठी उपाययोजना केल्या जातील', अशी माहिती अारोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी दिली.
अकोला येथील ऊनं म्हटलं की, अंगावर अक्षरश: काटेच उभे राहतात, अशा रखरखत्या उन्हात उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उष्माघातापासून बचावासाठी शासकीय रुग्णालयात वेगळा उष्माघात वॉ़र्ड तयार केला जातो. साधारणत: एप्रिल ते जूनपर्यंत हा वॉर्ड कार्यरत असतो. परंतु, सध्या मार्चमध्येच उन्हाची तीव्रता वाढली आहे, अशा रखरखत्या उन्हात जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये उष्माघातासाठी वेगळा वॉर्ड तयार होणे अपेक्षित होते. मात्र, मार्चचा अर्धा महिना झाला असूनदेखील जिल्ह्यातील एकही रुग्णालयात उष्माघातासाठी वेगळा वॉर्ड तयार करण्यात आलेला नाही.
दरम्यान, हवामान बदलामुळे विदर्भातील तापमानात खूप बदल झाला आहे. यामुळे उन्हाळ्यातील तापमानही दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता शासनाने उन्हाळ्यासाठी "हीट अॅक्शन प्लॅन' तयार केला आहे. या "प्लॅन'अंतर्गत उष्माघातापासून बचावासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येणार आहे. दरम्यान, उष्माघात झालेल्या रुग्णाला तत्काळ बरे करण्यासाठी हा वॉर्ड तयार केला जातो. परंतु, अकोला जिल्ह्यात गेल्या वर्षी तर हा वॉर्ड तयारच करण्यात आला नव्हता. शिवाय यंदा मार्च संपत आला, तरी वेगळा वॉर्ड तयार झालेला नाही. अकोलाचे तापमान बघता या ठिकाणी वेगळा वॉर्ड असणे नितांत गरजेचे आहे. परंतु, प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षतेमुळे मागील एक वर्षापासून रुग्ण वेगळ्या वॉर्डाच्या प्रतीक्षेत आहेत.
पावसाची शक्यता
मध्य भारतातील चक्रीवादळीय अभिसरणाच्या थंड उष्ण हवेमुळे अकोल्यात दोन दिवस तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. १८ १९ मार्च या दोन दिवशी विभागात तुरळक पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. दरम्यान, १७ मार्चला सायंकाळी अचानक तापमान कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला अाहे.
रुग्णालयात असतो वेगळा वॉर्ड
उष्माघात झालेल्या रुग्णाला बरे करण्यासाठी शासकीय रुग्णालयातच वेगळा वॉर्ड तयार केला जातो. साधारणत: जिल्ह्यातील सर्वच प्रकारच्या रुग्णालयांत ही व्यवस्था केली जाते. रुग्णांची संख्या पाहून सिव्हिल रुग्णालयात संपूर्ण वॉर्डमध्ये २५ खाटांची सोय केली जाते, तर इतर ठिकाणी खाटांची व्यवस्था करून वेगळा वॉर्ड तयार केला जातो.
काय कराल उपाययोजना?
}भरपूर पाणी प्या.
} थंड हवेत राहा.
} उन्हात जाताना कानाला डोक्याला पांढरा दुपट्टा बांधावा.
} गरज आहे तेव्हाच बाहेर पडा.
} उन्हात जाताना पांढरे कपडे घालावे, भडक कपडे टाळावे.
} काही कामे असल्यास सकाळी किंवा सायंकाळी करावे.
} जास्त गरम ठिकाणी किंवा उन्हात काम करण्याचे टाळावे.
काय आहेत लक्षणे?
}उष्माघात वात येणे.
} दिवसभरात सतत घाम जाणे आणि उष्णतेमुळे कमजोरी जाणवत राहणे.
} डोक दुखणे, चकरा येणे.
} शरीरावरील त्वचा लाल कोरडी पडणे.
} स्नायूत कमजोरी येणे तथा स्नायू दुखणे.
} चक्कर येऊन उलटीसारखे होणे.
अशी आहे रुग्णालये
सर्वोपचाररुग्णालय
उपजिल्हा रुग्णालय
ग्रामीण रुग्णालये
३० प्राथमिक आरोग्य केंद्रे
१०० उपकेंद्रे
सूचना दिल्या आहेत
^विदर्भातील अकोला,वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांतील संबंधित शासकीय रुग्णालयांना लेखी पत्र देऊन उष्माघात वॉर्ड तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लवकरच हे वॉर्ड कार्यान्वित होईल. "हीट अॅक्शन प्लॅन' च्या दृष्टीने बैठक बोलावून उपाययोजना प्रभावीपणे राबवली जाईल.'' डॉ. अविनाश लव्हाळे, आरोग्यउपसंचालक.
पाच दिवसांचे तापमान
तारीखकमाल किमान
१३ मार्च ३७.२ २४.०
१४ मार्च ३५.६ २१.०
१५ मार्च ३७.१ १८.५
१६ मार्च ३७.६ २०.४
१७ मार्च ३७.७ २४.६